Monday, November 18, 2024

/

उत्तर मतदार संघाला हवे खंबीर नेतृत्व! अमित देसाई इच्छुक

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटकाच्या राजकारणातील सर्वाधिक लक्ष वेधून घेणारा जिल्हा म्हणजे बेळगाव. सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्याच्या तयारीत असून कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावरून बेळगावच्या राजकारणात नेहमीच मोठी भर पडलेली पहायला मिळते.

या पार्श्वभूमीवर मराठी माणसाचा बुलंद आवाज असणारी महाराष्ट्र एकीकरण समिती आपल्या हक्कांसाठी सीमाभागात निवडणूक लढविते. मात्र गेल्या काही वर्षात समिती नेत्यांमध्ये पडलेली फूट आणि गटातटाचे राजकारण यामुळे समिती काही अंशी मागे पडली आहे. मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीला पुन्हा उभारी देण्यासाठी गेल्या २ ते ३ वर्षात अनेकांनी कस लावला आहे. ‘बेळगाव लाईव्ह’ चाही यामध्ये मोठा वाटा आहे.

गेल्या दोन वर्षांपूर्वी बेळगावमध्ये झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीची ताकद सीमाभागात आजमावण्यासाठी समितीने एक नेतृत्व उभे केले. निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेत सीमाभागातील मराठी ताकद आजमावली अनेकांच्या प्रयत्नातून एकवटल्याने त्या निवडणुकीत लाख भर मते मिळाली आणि यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीमागे सीमावासीय खंबीरपणे उभे राहिले. आगामी विधानसभा निवडणुकांचा विचार करून समितीने हि मोर्चेबांधणी केली.

आता विधानसभा निवडणुका काही महिन्यांच्या अंतरावर येऊन ठेपल्या असून निवडणुकीचे बिगुल कधीही वाजू शकते. मात्र अद्याप महाराष्ट्र एकीकरण समितीने उमेदवार निश्चित केले नाहीत, यामुळे प्रचार मंदावल्याने निदर्शनात येत आहे.

बेळगाव उत्तर, दक्षिण आणि ग्रामीण आणि खानापूर हे चार मतदार संघ समिती आणि मराठी माणसाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहेत. विधानसभा निवडणुकीच्या सदंर्भात नुकतीच शहरात एक वादळी बैठक पार पडली. यावेळी उमेदवार जाहीर करण्यासंदर्भात अनेकांनी सूचना-मार्गदर्शन केले. उत्तर मतदार संघाच्या उमेदवारीवरून ग्रामीण आणि दक्षिण मतदार संघाला बळकटी प्राप्त होते. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सध्या उत्तर मतदार संघात तगडा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविणे अत्यावश्यक असून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य इंजिनियर सेलचे समन्वयक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावान कार्यकर्ते अमित देसाई यांनी या निवडणुकीत उतरण्याची तयारी दर्शविली आहे. जर उत्तर मतदार संघात कुणी इच्छुकांनी अर्ज दिला नाही तर आपण या मतदार संघातून निवडणूक लढविण्याची तयारी देसाई यांनी दाखविली आहे.

अमित देसाई यांची भूमिका स्वागतार्ह आहे. त्यांचा जनसंपर्क, राजकारणातील अभ्यासू व्यक्तिमत्व, राजकीय परिस्थितीचा योग्य आढावा, उत्तर मतदार संघातील जनतेशी घनिष्ठ संबंध आणि सीमालढ्याशी निगडित त्यांचा अभ्यास या सर्व बाजू पाहता महाराष्ट्र एकीकरण समितीने त्यांच्या उमेदवारीचा विचार करणे चुकीचे ठरणार नाही. जर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंड्याखाली अमित देसाई निवडणूक लढवीत असतील तर त्यांची उमेदवारी सीमाभागासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल, अशी चिन्हे आहेत.

Amit desai
File pic amit desai with ncp chief sharad Pawar

उत्तर मतदार संघात आतापर्यंत असा तगडा उमेदवार समितनीय निवडणूक रिंगणात उतरवलेला नाही. हि संधी समितीकडे चालून आली असून समिती नेत्यांनी प्रयत्न केल्यास आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यास समितीची ताकदही वाढेल आणि याचा परिणाम दक्षिण आणि ग्रामीण मतदार संघातील वोटबँकेवर नक्कीच दिसून येईल. त्यामुळे युवा कार्यकर्त्यांकडून अमित देसाई यांच्या उमेदवारीसाठी मागणी पुढे येऊ लागली आहे.

महाराष्ट्र एकीकरण समिती हि लढाऊ संघटना आहे, अशा संघटनेच्या बैठकीत ज्यावेळी एखादा युवक धाडसी वृत्तीने लढायला तयार होत असेल तर अशा तरुणाच्या मागे योग्य ताकद आणि नियोजन उभे करणे गरजेचे आहे. विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून समितीने उमेदवार निवडीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण केली तर निवडणुकीची रणनीती आणि प्रचार करण्यास वेळ मिळेल. शिवाय हि बाब संघटना बळकटीकरणाच्या दृष्टीने समितीसाठी आणि सीमाभागातील मराठी जनतेसाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकेल .

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.