ऐन लग्नसराई त्याचबरोबर सुट्ट्यांचा काळ सुरू होत असताना कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारीख जाहिर झाल्यामुळे निवडणूक प्रचाराबरोबरच हक्काचे मतदान करून घेण्याच्या दृष्टीने कसे गणित मांडावे? याची चिंता आता राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांना लागली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज बुधवारी कर्नाटक विधानसभा निवडणुका जाहीर केल्या आहेत. निवडणुका जाहीर होताच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या त्याचबरोबर निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना प्रचंड वेग आला आहे.
यंदा ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत म्हणजे एप्रिल -मे महिन्यात निवडणूक होत असून, अनेक कारणांमुळे हक्काचे मतदान कसे होईल, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या सुरू झालेल्या उन्हाळ्यामुळे निवडणूक प्रचारादरम्यान राजकारणाबरोबरच उष्णतेचा पाराही कमालीचा चढणार आहे. कडक उन्हाच्या वेळी रहदारीचे रस्ते ओस पडतात. त्यामुळे उन्हाळ्यात कार्यकर्त्यांना प्रचारासाठी तर मतदारांना मतदानासाठी घराबाहेर आणण्यासाठी प्रवृत्त करणे हे मोठे आव्हान ठरणार आहे. याशिवाय एप्रिल महिन्यात शाळा-महाविद्यालयाच्या परीक्षा होत असतात. परीक्षा संपल्यानंतर पालक मुलांना घेऊन परगावी निघून जातात. त्यामुळे हक्काचा मतदार बाहेर गेला तर मतदान करून घेणे देखील अडचणीचे ठरणार आहे.
सर्वाधिक चिंतेचा विषय लग्न सोहळ्यांचा आहे. पुढील एप्रिल -मे महिन्यादरम्यान शुभकार्यांचे अनेक मुहूर्त आहेत. निवडणूक काळातच विवाह सोहळे, मुंज, भूमिपूजन असे शुभकार्यंचे अनेक मुहूर्त आहेत. मतदानाच्या दिवशी म्हणजे 10 मे रोजीच लग्नाची तिथी असल्याने अनेक नागरिक मंगल कार्यात व्यस्त असतील. तसेच अन्यत्र परगावी लग्न सोहळ्यासाठी जातील. परिणामी मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
असंख्य लोकांनी यापूर्वीच लग्न सोहळे आणि शुभकार्यांच्या तारखा निश्चित केल्या आहेत. ही बाबदेखील अडचणीची ठरणार आहे. शुभकार्यात व्यस्त असलेल्यांना मतदानासाठी प्रवृत्त करणे? हा अडचणीचा भाग ठरणार आहे.
बरेच जण शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षा संपल्यानंतर सुटीत परगावी जातात. त्याचादेखील मतदानाला फटका बसण्याची शक्यता आहे. यासाठी संबंधित मतदारांना मतदान झाल्यानंतर गावी जाण्यासाठी कसे प्रवृत्त करता येईल? या दृष्टीने उमेदवारांना आतापासूनच हालचाल करावी लागणार आहे. तथापि कांही का असेना कोणत्याही परिस्थितीत मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे.