Friday, January 3, 2025

/

शिवाजी महाराजांनंतर मुख्यमंत्र्यांचा मोर्चा संत बसवेश्वरांकडे!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : निवडणुका जवळ आल्या कि राष्ट्रीय पक्ष आणि त्यांचे नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक कल्पना लढवितात. बेळगावच्या राजकारणात निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मराठी भाषिकांचे मतदान महत्वपूर्ण आहे. हि बाब प्रत्येक राजकीय नेत्यांना माहित आहे. यासाठीच बेळगावमध्ये मराठी भाषिकांच्या भावनांनाच हात घालत, मराठी भाषिकांचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवरून गेला महिनाभर राजकारण सुरु आहे. येळ्ळूर येथील राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मूर्तीचे लोकार्पण असो किंवा बेळगाव दक्षिण मतदार संघात निर्माण करण्यात आलेली शिवसृष्टी असो, या माध्यमातून मराठी भाषिकांची मने जिंकण्यासाठी लोकप्रतिनिधींनी कंबर कसली आहे.

मराठी भाषिकांना आकर्षित करण्यासाठी लोकप्रतिनिधींचा सुरु असलेला आटापिटा कन्नड भाषिकांनाही रुचला नाही. लोकप्रतिनिधींचे मराठी आणि मराठी भाषिकांवर उफाळून येत असलेले प्रेम पाहून कन्नड संघटना आणि त्यांचे कार्यकर्ते खवळले. बेळगावमध्ये सुरु असलेल्या या राजकारणात मराठी भाषिकांसह कन्नड भाषिकांनाही गाजर दाखविण्याची ‘आयडिया’ राष्ट्रीय पक्षांनी लढविली असून आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती राजकारणानंतर जगज्योती संत बसवेश्वर महाराज यांच्या मूर्तीकडे राजकारण्यांनी मोर्चा वळविला आहे.

बसवेश्वर सर्कल येथे संत बसवेश्वर महाराजांच्या १५ फुटी कांस्य मूर्तीची पायाभरणी करण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी देखील खुद्द मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची उपस्थिती असणार आहे. या मूर्तीसाठी सरकार ३० लाख रुपयांचा खर्च करणार असून ५ कोटी रुपयांच्या खर्चातून अनुभव मंटप आणि बसवेश्वर महाराजांचा इतिहास सांगणारा चित्रपट अशा अनेक कामकाजाचे उद्घाटनदेखील होणार आहे.

मराठी मते मिळविण्यासाठी मराठी भाषिकांच्या भावना ज्या गोष्टीशी जोडल्या गेल्या आहेत, त्याच गोष्टींना लक्ष्य करून मराठी मतांचा जोगवा मागू पाहणाऱ्या राजकारण्यांना कन्नड संघटना, कन्नड नेते आणि कार्यकर्त्यांनी लक्ष्य केले. दरम्यान, मराठी भाषिकांना खुश करण्याच्या नादात असलेल्या राजकारण्यांनी ओढवलेल्या कन्नड रोषाचे ‘डॅमेज कंट्रोल’ करण्यासाठी पुन्हा मुख्यमंत्र्यांना बेळगाव दौरा आखावा लागला आहे.

या एकंदर परिस्थितीवरून वैयक्तिक स्वार्थासाठी राजकारण्यांनी गाठलेली हीन पातळी लक्षात येते. शिवाय ज्या थोर महापुरुषांनी जनतेला जे आचार-विचार आणि तत्वे दिली, त्यांची उघडपणे पायमल्ली होताना पाहावे लागणे आणि राजकारणासाठी थोर महापुरुषांचा अवमान होताना पाहणे, हे दुर्दैव म्हणावे लागेल.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.