Friday, April 26, 2024

/

पाणीपुरवठ्याच्या आश्वासनामुळे घागर मोर्चा मागे

 belgaum

अनगोळ येथील पाणीटंचाई व मोकाट कुत्र्यांच्या समस्या विरोधात संतप्त नागरिक आणि महिलांनी आज मंगळवारी महापालिकेवर घागर मोर्चा काढण्याची जय्यत तयारी केली होती. मात्र याबाबतची माहिती मिळताच एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अनगोळला धाव घेऊन चार दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यामुळे मोर्चा मागे घेण्यात आला.

अनगोळ येथील प्रभाग क्र. 51, 52, 57 आणि अन्य एक प्रभाग अशा एकूण चार प्रभागांमध्ये 24 तास पाणीपुरवठा योजना राबविली जाते. हा भाग डेमो झोनमध्ये असल्याकारणाने नियमानुसार येथील 24 तास पाणीपुरवठा बंद करता येत नाही.

तथापि गेल्या दोन महिन्यापासून अनगोळ येथे पाणीपुरवठ्याचा खेळखंडोबा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांचे विशेष करून गृहिणींचे मोठे हाल होत आहेत. 24 तास पाणी योजनेमुळे अनगोळ येथे विहिरी व कुपनलिकांची संख्या कमी आहे. त्याचप्रमाणे नागरिकांकडे पाणीसाठ्याची सुविधा देखील नाही. सदर प्रभागांचा परिसर हा स्लम भाग असल्याकारणाने येथील रहिवासी हे कामगार आणि नोकरदार वर्ग आहेत. त्यामुळे त्यांना बाजारातून पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आणणे अथवा 600 ते 700 रुपये मोजून पाण्याचा टँकर मागवणे परवडत नाही. पाण्याच्या समस्येबरोबरच अलीकडे या ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. ही कुत्री लोकांवर हल्ला करत असल्यामुळे अनगोळ येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

 belgaum

पाणीटंचाई आणि मोकाट कुत्र्यांच्या समस्येबाबत गेल्या आठवड्यात माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वाखाली कांही नागरिकांनी महापौर, उपमहापौर व आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. मात्र त्यांच्याकडून कोणतीच कार्यवाही न झाल्यामुळे गेल्या रविवारी शिवशक्तीनगर येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात झालेल्या अनगोळ परिसरातील नागरिकांच्या बैठकीत आंदोलन छेडून महापालिकेवर घागर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता.Ghagar morcha

त्यानुसार आज मंगळवारी सकाळी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. त्यासाठी धर्मवीर संभाजी चौक अनगोळ येथे राजू पवार, भाऊ कावळे, तुषार पिसे, बाळू रेडेकर, सुरेखा जाधव, नीता झरेकर आदींसह नागरिक व महिला मोठ्या संख्येने जमा झाल्या होत्या. हातात रिकामी घागरी आणि मागण्यांचे फलक धरून सर्वजण मोर्चा काढण्यासाठी सिद्ध झाले होते. मात्र याबाबतची माहिती मिळताच एल अँड टी कंपनीच्या अधिकारी व अभियंत्यांनी अनगोळ येथे धाव घेतली.

तसेच मोर्चेकरांची भेट घेऊन त्यांनी ग्लोब टॉकीज नजीक असलेल्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्यामुळे अनगोळ भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याची माहिती देऊन दिलगिरी व्यक्त केली. तसेच मोर्चा मागे घेण्याची विनंती करत येत्या चार दिवसात कोणत्याही परिस्थितीत पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन दिले. अधिकाऱ्यांच्या ठोस आश्वासनामुळे अनगोळवासियांनी आपला मोर्चा मागे घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.