Sunday, May 5, 2024

/

शिवसन्मान पदयात्रेच्या यशासाठी मराठी भाषिकांचा कृतज्ञ : कोंडुसकर

 belgaum

बेळगाव लाईव्ह : छत्रपती शिवाजी महाराज, मराठी अस्मिता, मराठी संस्कृती, मराठी भाषा आणि भगवा ध्वज यावरून सुरु असलेले अवमानाचे राजकारण थांबविण्यासाठी आणि मराठी माणसामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजिण्यात आलेल्या शिवसन्मान पदयात्रेला जनतेने दिलेल्या उत्स्फूर्त पाठिंब्याबद्दल रमाकांत कोंडुसकर यांनी जनतेचे जाहीर आभार मानले आहेत.

बेळगावात अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि व्यक्तिशः अनेक लोक काम करताना वेगवेगळ्या विचारधारेतून काम करताना दिसतात. या परिस्थितीत काही वेळा लोकांच्या भावनांना हात घालताना मने दुखावली जातात. काही कार्यकर्त्यांकडून चुका होतात. अशा अनेक घटनांचे बेळगाव परिसरात पेव फुटले आहे. ह्या सर्व घटनाकडे पहात असताना समाजमन जाणून घेणे हे आपल्याला गरजेचे वाटले आणि या समाजमनाचा कानोसा घेण्यासाठी राजहंसगड ते बेळगावचं रेल्वे स्टेशन असा पदयात्रेचा मार्ग निश्चित करून, पाच दिवसाचं ग्रामवास्तव्य व पदयात्रा असा कार्यक्रम करण्याचा संकल्प केला.

शिवसन्मान पदयात्रा अशा स्वरूपाचे याला नाव देण्यापाठीमागचा उद्देश निश्चित असा होता कि, गेले काही दिवस बेळगाव व बेळगाव परिसरात तसेच बेंगलोर आणि कर्नाटकातल्या अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांच्या प्रतिमांचे अवमूल्यन करण्यात आलं, काही ठिकाणी विटंबना करण्यात आली आणि त्यावेळी कर्नाटकातील राजकीय पक्ष काही ठोस भूमिका घेताना दिसले नाहीत तर ह्या सगळ्यांचा उद्रेक आणि या सगळ्यांला वाचा फोडण्यासाठी आपण या पद्धतीची शिवसन्मान पदयात्रा काढली, असे रमाकांत कोंडुसकर म्हणाले.

 belgaum

अनेक ठिकाणी होत असलेला भगव्या ध्वजाचा अवमान आणि या बाबत जनतेच्या काय भावना आहेत? हे जाणून घेण्यासाठी भगव्याचा जागर करत, जनतेला काय वाटते याचा आढावा घेण्याच्या उद्देशातून ही पदयात्रा निघाली. या प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत जनता जरी उघडपणे बोलत नसली तरी जनता जागरूक आहे, त्यांना या प्रश्नाविषयी माहिती आहे आणि त्यांच्या स्वतःच्या भावनाही तीव्र आहेत, हे लक्षात आले. कष्टकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, महिलांचे, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, रिंग रोड, बायपास रोड यासारखे प्रश्न भिजत घोंगडेप्रमाणे आहेत. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांचा झालेला अवमान या साऱ्याविषयी जनतेच्या भावना तीव्र आहेत.

या प्रश्नाबाबत आवाज उठवण्यासाठी काय करता येईल याबद्दल संवाद साधला. जनतेच्या भावनांना वाट करून देण्यासाठी उद्रेकाची गरज आहे. आणि या उद्रेकाला वाट मोकळी करून देण्याची क्षमता केवळ महाराष्ट्र एकीकरण समितीकडे आहे.

ज्यावेळी आपण चांगलं कार्य उभं करायला जातो त्यावेळी निश्चित समाज आपल्या पाठीमागे उभा राहतो, हि बाब पदयात्रेत प्रत्येक पावलावर जाणवली. जनतेने प्रत्येक गोष्टीचा सकारात्मकतेने विचार करून एकंदर उपक्रमाला पाठिंबा दिला. हा उपक्रम केवळ रमाकांत कोंडूस्कर या एका व्यक्तिमत्त्वाचा नसून सकल जनतेचा होता. हे यश केवळ रमाकांत कोंडुसकर या व्यक्तीचे नसून असंख्य कार्यकर्ते, बेळगावकर जनता आणि शिवप्रेमी, मराठी प्रेमी, महाराष्ट्र एकीकरण समिती, श्रीराम सेना या सगळ्यांचे आहे, असे मत रमाकांत कोंडुसकर यांनी व्यक्त केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.