Saturday, April 27, 2024

/

मिरची झाली ‘तिखट’!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : घरगुती गॅस सिलिंडर दरात ५० रुपयांनी झालेली वाढ, जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमती आणि यातच भर म्हणून दररोज स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या मिरचीचे दरदेखील उच्चांकी पातळीवर गेल्याने गृहिणींचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. वाढत्या महागाईचा चटका सहन करत असतानाच दैनंदिन गजरेच्या वस्तूंमध्येही होत असलेली मोठ्या प्रमाणातील वाढ सर्वसामान्यांना आर्थिक अडचणीत टाकत आहे.

सर्वसाधारण २००ते ४०० या दरात प्रतिकिलो मिळणाऱ्या लाल मिरच्यांचे दर तब्बल दुप्पट वाढले असून ३०० ते ८०० रुपये प्रतिकिलो दराने मिरची विक्री सुरु आहे. सध्या जत्रा, यात्रा, लग्न समारंभ अशा कार्यक्रमांची रेलचेल असून बेळगावच्या मिरची बाजारात ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मिरची खरेदी सुरु आहे.

बेळगाव शहरात मध्यवर्ती बाजारपेठेसह कपिलेश्वर परिसर, शहापूर स्मशानभूमी आदी ठिकाणी मिरची बाजार भरला जातो. संकेश्वरी, ब्याडगी, जवारी, काश्मिरी अशा विविध प्रकारच्या लाल मिरच्या बाजारात उपलब्ध आहेत. बेळगावमधील बहुतांशी महिला तिखट पावडर ऐवजी जवारी आणि ब्याडगी मिरच्यांचे तिखट उन्हाळ्यातच बनवून ठेवतात.

 belgaum

पावसाळ्यात हे काम शक्य नसल्याने एप्रिल ते मे या दरम्यान तिखट बनवायचे काम मोठ्या प्रमाणात सुरु असते. यादरम्यान मिरचीचे दर काहीसे वधारले असतातच. मात्र दरवर्षीपेक्षाही यंदा मिरचीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

मागील काही महिन्यांपासून बदलत्या हवामानाचा परिणाम रब्बीसह इतर पिकांवरही बसला असून याचा फटका मिरची उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. आवक कमी आणि मागणी जास्त यामुळे मिरचीच्या दरात प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.