बेळगाव लाईव्ह : चार-पाच दिवसांवर आलेल्या होळी पौर्णिमा आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावची बाजारपेठ रंगीबेरंगी रंगांनी सजली आहे. धुलिवंदनासाठी लागणाऱ्या साहित्यासह सणासुदीसाठी लागणारे साहित्यदेखील बाजारपेठेत उपलब्ध झाले आहे.
तरुणाई आणि बच्चेकंपनीसाठी धमाल असणाऱ्या या सणासाठी बाजारपेठेत देखील कमालीचा उत्साह दिसून येत आहे. कोरोनानंतर मागील वर्षापासून होळी सणावरील निर्बंध हटविण्यात आले असून यंदा बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आकर्षक पद्धतीच्या, रंगीबेरंगी, कार्टून कॅरेक्टरवर आधारित पिचकाऱ्या बच्चेकंपनीचे लक्ष वेधत आहेत. अतिशय लहान आणि अतिशय मोठ्या आकारातील पिचकाऱ्यांना मोठी मागणी असून यंदा बाजारपेठेत नैसर्गिक रंगांची अधिक चलती आहे.
नैसर्गिक रंगांसह विविध आकर्षक रंगदेखील बाजारात उपलब्ध झाले आहेत. मात्र, केमिकल मिश्रित रंगापेक्षा ग्राहक नैसर्गिक रंगांना अधिक पसंती देत आहेत. सिल्व्हर आणि गोल्डन रंगांची तरुणाईमध्ये अधिक चलती लक्षात घेऊन विक्रेत्यांनी सिल्व्हर-गोल्डन रंगांसह आकर्षक मास्क आणि विग देखील विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहेत.
मारुती गल्ली, खडेबाजार, कडोलकर गल्ली, गणपत गल्ली, मेणसे गल्ली याठिकाणी रस्त्यावर ठिकठिकाणी स्टॉल्स लावण्यात आले असून खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. पांगुळ गल्ली आणि मेणसे गल्ली या भागात घाऊक व्यापाऱ्यांची मोठी संख्या असून याठिकाणी आकर्षक पद्धतीचे साहित्य दाखल झाले आहे.
रविवार नंतर सलग दोन दिवस सण आल्याने नागरिकांनाही सणाची पर्वणी मिळाली असून बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांचा ओढा वाढला आहे. बेळगावमध्ये वडगाव-शहापूर भाग वगळता होळीच्या दुसरे दिवशी धुलिवंदनाचा कार्यक्रम साजरा केला जातो. तसेच होळी पौर्णिमेदिवशी पुरणपोळीचा बेत आणि धुलिवंदनादिवशी मांसाहाराचा बेत आखला जातो. यामुळे चिकन आणि मटण दुकानासमोर आतापासूनच मंडप घालून तयारीदेखील सुरु झाली आहे.