बेळगाव लाईव्ह : महापालिकेचे अंदाजपत्रक मंजूर होण्याआधीच स्थायी समित्यांची निवडणूक होणे आवश्यक होते मात्र या निवडणुका लांबणीवर पडल्या असून आता जून महिन्यातच बेळगाव महापालिकेच्या स्थायी समित्यांची निवडणूकहोईल, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे इच्छुकांना आता दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.
विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यामुळे आता स्थायी समित्यांची निवडणूक होणार नाही. १५ जून रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार असली, तरी स्थायी समिती निवडणूक जून महिन्यातच होईल. त्यामुळे स्थायी समित्यांचा कार्यकाळ चार महिन्यांनी कमी होणार आहे. स्थायी समित्यांचा कार्यकाळ वाढवून देण्याची मागणी होऊ शकते, पण निवडणुकीनंतर स्थायी समिती सदस्य व अध्यक्षांना त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा लागणार आहे.
६ फेब्रुवारी रोजी बेळगाव मनपाची महापौर व उपमहापौर निवडणूक झाली. त्यानंतर आठवडाभरात स्थायी समिती निवडणूक होणे अपेक्षित होते, पण तसे झाले नाही. स्थायी समिती निवडणूकही प्रादेशिक आयुक्तांकडूनच घेतली जाते. निवडणूक घेण्याचा प्रस्ताव महापालिकेकडून प्रादेशिक आयुक्त कार्यालयाकडे पाठवावा लागतो. हा प्रस्ताव पाठविण्यास विलंब झाला. प्रादेशिक आयुक्तांना प्रस्ताव मिळाला त्यावेळी प्रशासकीय यंत्रणा विधानसभा निवडणूक पूर्वतयारी कामात व्यस्त होती.
त्यामुळे प्रादेशिक आयुक्तांनी स्थायी समिती निवडणूक घेण्याकडे दुर्लक्ष केले. सध्या कर्नाटक विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून निवडणूक आचारसंहितादेखील लागू झाली आहे. त्यामुळे आचारसंहिता संपेपर्यंत निवडणूक घेता येणार नाही. जून महिन्यात आधी स्थायी समित्यांची निवडणूक होईल. त्यानंतर महापौरांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती अध्यक्षांची निवडणूक होईल.
२०१० साली महापौर निवडणुकीत गोंधळ झाल्यामुळे उपमहापौर व स्थायी समित्यांची निवडणूक झाली नव्हती. तब्बल सहा महिने विलंबाने उपमहापौर व स्थायी समिती निवडणूक झाली होती. त्यावेळी उपमहापौर व स्थायी समित्यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करण्याची मुभा शासनाकडून देण्यात आली होती. त्यामुळे महापौर निवडणूक तसेच उपमहापौर व स्थायी समिती निवडणुकीचे वेळापत्रकच बदलले होते. त्याची पुनरावृत्ती यावेळी होऊ शकते.