बेळगाव लाईव्ह : जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या सूचनेनुसार महापालिकेच्या नव्याने उभारण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीत बेळगाव दक्षिण आणि बेळगाव उत्तर मतदारसंघांसाठीचे कामकाज चालणार आहे. तर ग्रामीण ग्रामीण मतदारसंघाचे काम बुडा कार्यालयात चालणार आहे.
विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधीपासून महापालिकेने निवडणुकीचे काम हाती घेतले होते. त्यानुसार महापालिकेच्या नव्याने उभारण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीत निवडणूक कामकाज सुरू करण्यात आले आहे.
उमेदवारी अर्ज भरणा, उमेदवारांना मार्गदर्शन, बैठक या कामकाजासह महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत बेळगाव दक्षिण आणि उत्तर मतदारसंघांच्या निवडणूक अधिकाऱ्यांचे कक्ष उभारण्यात आले आहेत.
निवडणुकीदरम्यान प्रचाराकरिता सभा, बैठक व जाहिरातबाजी करण्यासाठी निवडणूक विभागाकडून परवानगी घेणे बंधनकारक असल्याने या कार्यालयातून परवानगी देण्याची व्यवस्था केली आहे. निवडणुकीसंदर्भातील प्रत्येक कामासाठी या कार्यालयात संपर्क साधावा लागणार आहे.
तर बुडा (बेळगाव नगरविकास प्राधिकरण ) कार्यालयात बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचे काम चालणार आहे. या कार्यालयात उमेदवारी अर्ज भरणा करण्यात येणार असून निवडणुकीसंदर्भातील सर्व परवानग्या येथूनच देण्यात येणार आहेत.
याआधी तहसील कार्यालयातून हे काम चालत होते. यंदा मात्र ही जबाबदारी बुडा कार्यालयावर सोपवण्यात आली आहे. बुडा आयुक्त राजशेखर डंबळ हे निवडणूक अधिकारी असून तहसीलदार सिद्राय भास्की हे साहाय्ययक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.