छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळण्यास वडगाव येथील एका शाळेमध्ये अडवणूक केली जात असून याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव -पाटील यांनी तात्काळ त्या शाळेच्या मुख्याध्यापकांची भेट घेतली. तसेच बलिदान मास पाळणाऱ्या विद्यार्थ्यांची अडवणूक करू नये, अशी विनंती केली.
बेळगाव शहर परिसरात सध्या छ. संभाजी महाराज बलिदान मास पाळला जात आहे. या काळात अनेक शंभूभक्त अनवाणी राहतात, तर कांहीजण केशवपनही करतात. बरेच जण गोडधोड न खाता मासांहार वगैरे आपली आवडती गोष्ट व्यर्ज करतात. त्यानुसार कांही विद्यार्थ्यांनी पायात बुट-चप्पल न घालणे, डोक्याचे मुंडन करणे, कपाळाला टिळा लावणे अशा पद्धतीने बलिदान मासाचे आचरण सुरू केले आहे.
त्यानुसार वडगाव येथील संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेत कपाळावर टिळा लावून शाळेचे बूट न घालता अनवाणी जाण्यास सुरुवात केली. मात्र शाळा व्यवस्थापनाने त्या विद्यार्थ्यांना तसे करण्यास मज्जाव केल्यामुळे त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव -पाटील यांच्याकडे तक्रार केली.
सदर प्रकार समजताच माधुरी जाधव -पाटील शाळेकडे धाव घेऊन मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापनाची भेट घेतली. तसेच त्यांना छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासाचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांना बलिदान मास पाळण्याकरिता सहकार्य करावे. बलिदान मासाच्या 30 दिवसाच्या कालावधी संबंधित विद्यार्थ्यांना बूट न घालण्याची आणि टिळा लावण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती शिवप्रतिष्ठांच्यावतीने केली.
दरम्यान, शहरात अलीकडेच अन्य एका शाळेमध्ये बलिदान मास पाळणाऱ्या विद्यार्थ्यांना जाब विचारण्यात आला. तसेच तब्बल 20 हून अधिक विद्यार्थ्यांना चांचणी परीक्षेला बसून देण्याची सूचना केली गेली.
घरी परतल्यानंतर विद्यार्थ्यांनी पालकांना याबाबतची माहिती देताच त्यांनी शाळा व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. एकंदर कांही शाळांमध्ये बलिदान मासाचे पालन करण्यास आडकाठी आणली जात असल्याबद्दल पालकातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.