बेळगाव लाईव्ह : गेले कित्येक दिवस बेळगावमध्ये १० रुपयांचे नाणे बाजारात स्वीकारले जात नाही. रिझर्व्ह बँकेने अनेकवेळा आवाहन करूनही बेळगावातील व्यापारी १० रुपयांच्या नाण्याला का नकार देत आहेत? याचे उत्तर कुणाकडेच मिळत नाही.
सरकारने किंवा रिझर्व्ह बँकेने एखादं चलन व्यवहारातून बाद केल्याशिवाय ते अस्वीकार्य ठरत नाही. मात्र १० रुपयांच्या नाण्यासंदर्भात कोणत्या विशिष्ट हेतूने अपप्रचार केला गेला हि बाब लक्षात येत नाही. केवळ बेळगाव आणि परिसरातच १० रुपयांची नाणी स्वीकारण्यासाठी बहुतांशी ठिकाणी नकार देण्यात येत आहे. मात्र महाराष्ट्र आणि इतर राज्यात १० रुपयांचे नाणे हे चलनात आहे. हे नाणे बँकेत स्वीकारले जात आहे. ज्या अर्थी बँकेत हे नाणे स्वीकारले जाते त्या अर्थी हे नाणे सर्वत्र स्वीकारलेच जाते. मात्र बेळगावमधील भाजीविक्रेते, लहान सहान व्यापारी आणि बऱ्याच ठिकाणच्या व्यावसायिकांकडून जाहीरपणे हे नाणे स्वीकारण्यासाठी नकार दिला जातो. अलीकडेच या नाण्यांसंदर्भात ‘बेळगाव लाईव्ह’ वर वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. याचप्रमाणे बेळगावच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनीही दहा रुपयांच्या नाण्यासंदर्भात विशेष आवाहन करत आदेशही जारी केला होता. मात्र याबाबत म्हणावी तशी जनजागृती झाली नाही किंवा एका विशिष्ट हेतूने षडयंत्र रचून हे नाणे स्वीकारले जात नाही, याचा शोध घेणे गरजेचे आहे.
बेळगावमधील सूज्ञ जनता कधीच अफवांवावर विश्वास ठेवत नाही. परंतु अशा पद्धतीच्या बातम्यांवर विश्वास ठेवून १० रुपयांचे नाणे अस्वीकार्य ठरवण्यात येत आहे, हि कुतूहलाची आणि अज्ञानाची बाब आहे. शिवाय हा एकप्रकारचा देशद्रोह आहे. आपल्या देशातील चलनातील नाणे असो किंवा इतर कोणतेही चलन, बॉण्ड, सरकारी कागदपत्रे अशापद्धतीने अस्वीकार्य ठरविणे म्हणजे राष्ट्रीय गुन्हाच आहे. बेळगावमधील सुशिक्षित जनतेने १० रुपयांच्या नाण्यासंदर्भात घेतलेली भूमिका हि अत्यंत चुकीची आहे. जोवर रिझर्व्ह बँक किंवा सरकार अधिकृतपणे अशा संदर्भात कोणतीही ठोस भूमिका घेऊन ती जाहीर करत नाही तोवर कोणत्याही अफवांवर किंवा चुकीच्या माहितीच्या आधारे एखादा निर्णय घेऊन त्यावर अंमलबजावणी करणे हे चुकीचे आहे, हे बेळगावमधील जनतेला कधी कळणार?
नाण्यांपेक्षा नोटांसाठी लागणारा महसूल अधिक आहे. नोटा जीर्ण होतात. फाटतात. अशा नोटा परत परत छापाव्या लागतात. यासाठी छपाई, कागद अशा अनेक प्रकारच्या खर्चाच्या बाबी वाढत जातात. यापेक्षा नाण्यांसाठी लागणारा महसूल तुलनेत कमी लागतो.
शिवाय नाण्यांचे आयुष्यही अधिक असते आणि याचबरोबर पर्यावरणाची हानी होणे देखील वाचते, हाही भाग जनतेने लक्षात घेणे गरजेचे आहे. १० रुपयांच्या नाण्यासंदर्भात असलेला गैरसमज दूर सारून बेळगावच्या सूज्ञ जनतेने आपल्या चलनाचा सन्मान करणे आवश्यक आहे. १० रुपयांच्या नाण्यांचा सर्रास वापर करण्यात यावा, अशी मागणी बेळगावच्या जाणत्या नागरिकांतून होत आहे.