बेळगाव लाईव्ह : हिडकल जलवाहिनीला कुंदरगी उपसाकेंद्राजवळ लागलेल्या गळतीमुळे बेळगाव शहराच्या पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण झाला होता. सदर गळती काढून जलवाहिनी दुरुस्त करण्यात एल अँड टी कंपनी व पायाभूत सुविधा मंडळाला यश आले असून शनिवारपासून संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.
बुधवारी जलवाहिनीला गळती लागल्यानंतर लगेचच हिडकल जलाशयातून होणारा पाणी उपसा बंद करण्यात आला होता. शिवाय गळती काढण्याचे कामही हाती घेण्यात आले. गळती काढण्याचे काम रात्री अकरा वाजताच पूर्ण करण्यात आले. दुरुस्तीनंतर लगेचच पाण्याचा उपसा करता येत नाही.
यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे गुरुवारी पहाटे हिडकल जलाशयातून पाण्याचा उपसा सुरु करण्यात आला आहे, मात्र, शहराला शनिवारपासूनच पाणीपुरवठा सुरळीतपणे होणार आहे, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे.
उन्हाळ्यात सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, अशी अपेक्षा नागरिकांची असते, पण कधी जलवाहिनीला गळती तर कधी खंडित वीजपुरवठ्यामुळे पाणीटंचाईची स्थिती शहरात उद्भवते. आता तीन आठवड्यांच्या काळात तीनवेळा शहर पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. गळती लागल्यानंतर पाण्याचा उपसा बंद केल्यामुळे गुरुवारी शहरातील ज्या विभागात पाणीपुरवठा करावा लागणार होता, तेथे पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे आता उपसा सुरु झाल्यानंतर आधी त्या विभागांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. मात्र, संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास आणखी एक दिवसाचा कालावधी लागणार आहे. जानेवारी महिन्यात दोन वेळा बेळगाव शहराच्या पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण झाला होता.
हिडकल पाणी योजनेतील जलवाहिनीला पाच ठिकाणी गळती लागली होती. ती गळती काढण्यासाठी तीन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यावेळी बेळगावकरांचे मोठे हाल झाले होते. त्यानंतर आठवडाभरातच हिंडलगा येथील उपसा केंद्रातील विद्युतपंप दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे तेथील पाण्याचा उपसा बंद ठेवण्यात आला होता.
त्यावेळी शहराच्या उत्तर विभागात पाणीटंचाई निर्माण झाली होती. जानेवारी महिन्यात २० ते २२ या तीन दिवसांच्या काळात शहर पाणीपुरवठा ठप्प झाला होता. आता हिडकल जलाशयातील सर्व दुरुस्तीकामे पूर्ण झाली असून शनिवारपासून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.