बेळगाव शहरातील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचा 22 वा वार्षिक दीक्षांत (पदवीदान) सोहळा येत्या शुक्रवार दि. 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:30 वाजता डॉ. एपीजे अब्दुल कलाम सभागृह, जनसंगम, व्हिटीयू, बेळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
कर्नाटकचे राज्यपाल आणि विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचे व्हीटीयू कुलगुरू थावरचंद गहलोत हे या सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. तांत्रिक शिक्षणासाठी असलेल्या अखिल भारतीय परिषदेचे (एआयसीटीइ) चेअरमन प्रा. टी. जी. सिताराम हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच राज्याचे उच्च शिक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान आयटीबीटी कौशल्य विकास आणि उदरनिर्वाह खात्याचे मंत्री डॉ. सी. एन. अश्वथ नारायण हे सन्माननीय अतिथी म्हणून हजर असतील.
यंदाच्या आपल्या 22 व्या वार्षिक दीक्षांत सोहळ्यात विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाकडून ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही अत्यंत प्रतिष्ठेची पदवी टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचे माजी व्हा. चेअरमन कै. विक्रम किर्लोस्कर (मरणोत्तर), वाबको इंडिया लि. व टीव्हीएस ऑटोमोटिव्ह सोल्युशन प्रा. लि.चे चेअरमन एम. लक्ष्मीनारायण आणि बेळगाव फेरोकास्ट इंडिया प्रा. लि. (बीएफपीएल) चे व्यवस्थापकीय संचालक सचिन बी. सबनीस यांना प्रदान केली जाणार आहे. याव्यतिरिक्त या सोहळ्यात व्हिटीयूकडून 51,905. विद्यार्थी विद्यार्थिनींना बीई. /बी. टेक., 9 जणांना बी. प्लॅन., 1032 जणांना बी. आर्क., 4279 जणांना एमबीए, 2028 जणांना एमसीए, 1363 जणांना एम.टेक., 82 जणांना एम.आर्क. आणि एका विद्यार्थ्याला पदव्युत्तर पदवी प्रदान केली जाणार आहे. या पद्धतीने यंदा व्ही. टी. यु. कडून 700 जणांना सन्मानित करण्याबरोबरच संशोधनातील पीएचडी आणि 2 एम.एससी. (इंजी) तसेच संशोधन विद्वानांना चार एकीकृत दुहेरी पदव्या दिल्या जाणार आहेत.
दीक्षांत सोहळ्यास उपस्थिती दर्शविण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थी, प्राचार्य आणि पालकांसाठी शुक्रवार दि. 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते 8:30 वाजेपर्यंत सीबीटी बस स्थानकापासून विद्यापीठापर्यंत वाहतुकीची सोय करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पत्रकार आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीसाठी त्यादिवशी सकाळी 9 वाजता वार्ता भवन बेळगाव येथून वाहनाची सोय करण्यात आली आहे.