बेळगाव लाईव्ह : सोमवार दि. ६ फेब्रुवारी रोजी बेळगाव महानगरपालिकेची महापौर-उपमहापौर निवडणूक होणार आहे. महापौर आणि उपमहापौर पदासाठी जाहीर झालेल्या आरक्षणानुसार महापौरपदी भाजपचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित होणार यात शंका नाही.
मात्र उपमहापौर पदासाठी जाहीर झालेल्या आरक्षणानुसार महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेविका वैशाली भातकांडे या पात्र उमेदवार ठरत आहेत. भाजपनेही आरक्षणानुसार प्रमाणपत्र मिळविण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत मात्र, प्रमाणपत्र न मिळाल्यास समितीच्या वैशाली भातकांडे यांची बिनविरोध निवड होणार आहे.
उपमहापौरपदासाठी असलेले आरक्षण म. ए. समितीकडे असल्यामुळे ही निवडणूक लढवण्याचा निर्णय म. ए. समितीने घेतला आहे. याबाबत मध्यवर्ती समिती बैठकीत चर्चा झाली असून नगरसेविका वैशाली भातकांडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
महापालिकेत भाजपकडे बहुमत आहे. पण, उपमहापौरपदाच्या आरक्षणाचे उमेदवार त्यांच्याकडे नसल्यामुळे म. ए. समितीने तटस्थपणे ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही राष्ट्रीय पक्षाची मदत न घेता, पक्षात समाविष्ट न होता ही निवडणूक लढण्यात येणार आहे. त्यामुळे नगरसेविका वैशाली भातकांडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करावा, अशा सूचना समिती नेतृत्वाने दिल्या आहेत.
उपमहापौर निवडणुकीत म. ए. समिती उतरणार असल्यामुळे या निवडणुकीची चुरस पुन्हा वाढणार आहे. उपमहापौरपद ओबीसी ब वर्ग महिला – नगरसेविकेसाठी राखीव असल्यामुळे भाजपनेही हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पण, हे प्रमाणपत्र मिळाले नाही तर समितीच्या वैशाली भातकांडे बिनविरोध विजयी होऊ शकतात.