रहदारी नियमांचा भंग केल्याप्रकरणी चलनाच्या स्वरूपात ठेवण्यात आलेल्या प्रलंबित दंडाच्या वसुलीसाठी दंडात 50 टक्के सूट देण्यात आली आहे.
ही ऑफर आज शनिवार 11 फेब्रुवारीपर्यंत खुली असून काल शुक्रवारी 10 फेब्रुवारीपर्यंत 12 हजार 760 रहदारी नियम भंग गुन्ह्यांसाठी रहदारी पोलिसांकडे 28 लाख 26 हजार 500 रुपये इतका दंड जमा झाला आहे.
विना हेल्मेट, नो पार्किंगमध्ये वाहन उभे करणे, वन-वे, ट्रिपल रायटिंग तसेच इतर प्रकारचे रहदारी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक नियमन कक्षातून (टीएमसी) दंडाच्या नोटीसा पाठविण्यात आले आहेत.
मात्र बहुसंख्य वाहन चालक मालकानी हा दंड भरलेला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रलंबित असलेला हा दंड वसूल व्हावा यासाठी सरकारने दंडाच्या रकमेत 50 टक्के सवलत दिली आहे. आज शनिवार दि 11 फेब्रुवारीपर्यंत जे वाहन चालक दंडाची रक्कम भरतील त्यांच्याकडून केवळ 50 टक्के दंड भरून घेतला जाणार आहे. मात्र दंडात इतकी सूट देऊन देखील अद्यापही या ऑफरला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही.
बेळगाव शहरात 6.28 लाख रहदारी नियम भंग गुन्ह्यांच्या प्रकरणांपैकी केवळ 12,760 प्रकरणांचा काल शुक्रवारपर्यंत निपटारा झाला आहे. प्रलंबित दंड जास्तीत जास्त वसूल व्हावा यासाठी आता रहदारी पोलीस देखील रस्त्यावर उतरले असून त्यांनी ठीकठिकाणी वाहनांची धरपकड सुरू केली आहे.
सध्या त्यांच्याकडून संबंधित वाहनांचा नोंदणी क्रमांक तपासून त्यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत याची तपासणी केली जात आहे. दंड भरण्यास असमर्थता दर्शवणाऱ्यांची वाहने जप्त करून पोलीस स्थानकात नेली जात आहेत.