बेळगाव लाईव्ह : राज्य आणि केंद्र सरकारने वरवर बळीराजासंदर्भात काळजी दर्शविली तरी शेतजमिनी संपादित करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे सत्र दुसऱ्या बाजूने सुरूच आहे.
आता बेळगाव ते धारवाड नियोजित रेल्वे मार्ग सुपीक जमिनीतून करण्याचा विचार सुरु असून शेतकऱ्यांचा विरोध डावलून निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या भागातील शेतकऱ्यांनी आपली जमीन संपादित करू नये यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. मात्र, बेळगाव ते धारवाड मार्गाची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोधावरून काम सुरू करण्याचा प्रयत्न रेल्वे खात्याकडून सुरू झाला आहे.
या रेल्वेमार्गासाठी 243 कोटी 66 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सदर रेल्वे मार्ग दोन वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. या रेल्वेमार्गाची एकूण लांबी 73.2 किलोमीटर आहे. या रेल्वे मार्गावर बेळगाव, देसूर, के.के. कोप, कित्तूर, धारवाड असे एकूण सात स्थानके असणार आहेत.
या मार्गावर एकूण 140 पूल उभारण्यात येणार आहेत. या संपूर्ण रेल्वे मार्गासाठी 335 हेक्टर जमिनीचे संपादन होण्याची शक्यता आहे. रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच योजनेसाठी अनुदानही मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.