बेळगाव लाईव्ह : राज्यात लवकरच १५ हजार शिक्षकांच्या जागा भरतीची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता असून शिक्षक भरतीसाठी पुन्हा एकदा शिक्षण खात्याने पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीचे काम हाती घेतले आहेत.
पात्र उमेदवारांची यादी जाहीर करताना उमेदवारांना मूळ कागदपत्रांसह हजर राहण्याची सूचना करण्यात आली होती. त्यामुळे अगोदरच कागदपत्रांची पडताळणी झाली आहे. मात्र, यादी तयार करण्यात आल्यानंतर पुन्हा समस्या निर्माण होऊ नये यासाठी काही उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात असल्याची माहिती शिक्षण खात्याने दिली आहे. येत्या आठ दिवसात यादी तयार करण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे, अशी माहिती देण्यात आल्याने पात्र उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
शिक्षक भरतीसाठी ज्या महिला उमेदवार पात्र ठरल्या आहेत, त्यांच्या नावात लग्नानंतर बदल झाले आहेत. अशा महिला उमेदवारांच्या कागदपत्रांची फेरतपासणी केली जात आहे. मात्र, यापूर्वीच सर्व पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी झाली असल्याने फक्त औपचारिकता म्हणून पुन्हा एकदा कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे अंतिम यादी तयार करण्यास सुलभ होणार आहे.
राज्यात १५ हजार शिक्षकांच्या जागा जानेवारीपूर्वी भरती व्हाव्यात यासाठी शिक्षण खात्याने नोव्हेंबरमध्ये पात्र उमेदवारांची तत्कालिक यादी जाहीर केली होती. मात्र, या यादीवर आक्षेप घेत काही उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर जानेवारीत न्यायालयाने तात्कालिक यादी रद्द करुन नवीन यादी तयार करण्याची सूचना केली. त्यामुळे शिक्षक भरती प्रक्रिया रखडण्याची चिन्हे निर्माण झाली. मात्र, पुन्हा एकदा चार दिवसापासून शिक्षण खात्याने पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे काम हाती घेतले आहे. यानुसार राज्यातील १५ हजार शिक्षकांच्या जागांवर लवकरच भरती प्रक्रिया होण्याची शक्यता आहे.