Wednesday, June 26, 2024

/

शिवसन्मान पदयात्रेतून मराठी चळवळीला बळ

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये निवडणुका जवळ आल्या तरच केवळ मराठीचे भांडवल करत अनेक राजकारणी आपली पोळी भाजून घेतात. मात्र निवडणुकीचा भाग वगळता बेळगावमधील मराठी माणसावर नेहमीच कुरघोड्या करण्याचा प्रयत्न केला जातो.

एरव्ही मराठी माणसाचा यत्किंचितही विचार न येणाऱ्या राजकारण्यांना ऐन निवडणुकीच्या काळात मराठी आणि मराठी भाषिकांचा पुळका येतो. अशा वातावरणात मराठीचा झेंडा घेऊन संपूर्ण दक्षिण मतदार संघ फिरून शिव सन्मान जागवण्याचे काम रमाकांत कोंडूसकर यांनी केले. त्यामुळे मराठी चळवळीतील पुन्हा नवचैतन्य निर्माण झाले आहे.

रमाकांत कोंडुसकर यांनी आजवर अनेक आंदोलने हाती घेतली. बेळगावमध्ये भगव्या ध्वजावरून नेहमीच राजकारण होते. याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि मराठी भाषेबाबत नेहमीच दुटप्पीपणाची वागणूक देण्यात येते. याविरोधात एल्गार पुकारत रमाकांत कोंडुसकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसमवेत शिवसन्मान पदयात्रा पुकारली. आणि या पदयात्रेत उद्देश सार्थ करून दाखविला. बेळगावमध्ये अद्ययावत आणि सुसज्ज असे रेल्वेस्थानक उभारण्यात आले आहे. जुन्या रेल्वेस्थानकाचा कायापालट करून रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. याठिकाणी छत्रपती शिवरायांचे शिल्प बसविण्याची मागणी त्यांनी केली होती.

 belgaum

दरम्यान रेल्वेस्थानकाचा गोडाऊनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिल्प लपविल्याची बाब समोर आली. मात्र, रेल्वेस्थानकाच्या उदघाटनापूर्वी रेल्वेस्थानकावर छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प बसविण्याची तीव्र लोकेच्छा ओळखून अखेर रेल्वे स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प बसविण्याचा अट्टाहास रमाकांत कोंडुसकर यांनी पूर्ण केलाच. शिवाय रेल्वेस्थानकासमोर भगवाही फडकाविला.Shiv sanman

शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लपविले शिल्प ज्यावेळी निदर्शनात आले, यावेळी संतापाचा उद्रेक झाला. भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्रित येऊन उदघाटनाच्या आधी एक दिवस रेल्वेस्थानकावर मोठा गोंधळ निर्माण झाला. रेल्वे विभागाचे अधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक हा प्रकार घडवून आणून जनतेच्या भावनांशी खेळ केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी शिवशक्ती आणि भीमशक्ती एकवटल्या तर कशापद्धतीने शक्ती वाढेल, याचा प्रत्ययही काल आला.

रमाकांत कोंडुसकर यांनी हाती घेतलेले कार्य तडीस नेले, यामुळे बेळगावमधील मराठी भाषिकांच्या मनात पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण झाले असून रमाकांत कोंडुसकर यांच्यासारख्या नेत्याची बेळगावमधील मराठी जनतेला नितांत गरज असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.