Friday, April 26, 2024

/

बाबुराव पुसाळकर यांच्या फौंड्री योगदानाबद्दल पंतप्रधानांच्या भाषणात उल्लेख

 belgaum

बेळगाव लाईव्ह : स्टार्टअप हब म्हणून सध्या नावारूपास आलेल्या कर्नाटक राज्यात १०० वर्षांपूर्वी बेळगाव जिल्ह्यात स्टार्टअपची सुरुवात झाली असून याचा श्रीगणेशा बाबुराव पुसाळकर यांच्या माध्यमातून झाला असल्याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या भाषणात केला.

बेळगाव दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधानांनी मालिनी सिटी येथे जाहीर सभेत भाषण केले. यावेळी बोलताना बेळगावच्या फौंड्री क्लस्टरचे बाबुराव पुसाळकर यांनी १०० वर्षांपूर्वी औद्योगिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला.

बेम्को म्हणजेचज बेळगाव इलेक्ट्रो मोटर्स कंपनीने बेळगावमध्ये स्टार्टअप सुरु केला. बाबुराव पुसाळकर या उद्योजकांनी शहरात एक छोटे युनिट उभारले. आणि तेव्हापासून बेम्को फाउंड्री आणि हायड्रॉलिक युनिट्सचा आधार बनली. सध्या शहरात मोठ्या प्रमाणात क्रँकशाफ्ट, औद्योगिक कास्टिंग आणि फोर्जिंग, यंत्रसामग्री, हायड्रॉलिक आणि ऍल्युमिनियम उत्पादन युनिट्स आहेत.

 belgaum

परंतु 100 वर्षांपूर्वी बेळगाव येथील बाबूराव पुसाळकर यांनी या स्टार्टअप संस्कृतीची सुरुवात त्यांच्या कॅम्प आणि त्यानंतर बेळगाव इलेक्ट्रो मोटर्स कंपनीच्या गॅरेजमधून केली.Pusalkar

ट्रक क्लीनर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या बाबुराव पुसाळकर यांनी भविष्यात खूप प्रगती केली. स्वतःच्या दोन बस खरेदी केल्या. त्यानंतर त्यांनी आणखी दोन ट्रक जोडले. दुस-या महायुद्धात इंधनाची कमतरता जाणवल्याने त्यांनी विजापूर सोडून बेळगावला स्थलांतर केले.

यादरम्यान त्यांनी कॅम्पमध्ये गॅरेज सुरू केले. युद्धानंतर, जीवनावश्यक वस्तूंचा मोठा तुटवडा होता. यामुळे परिस्थितीशी जुळवून घेत पिठाच्या गिरण्या तयार करण्याची सुरुवात केली आणि भारतातील सर्वोत्तम चक्की निर्माता अशी त्यांची ओळख बनली. हळूहळू प्रगतीचा मार्ग इतका वेगवान होत गेला कि त्यानंतर बेम्को कडे रेल्वेने जॅक बनवण्यासाठी बाबुराव पुसाळकर यांच्याशी संपर्क साधला आणि एका वर्षातच, बेम्को ही भारतातील पहिल्या क्रमांकाची जॅक बनवणारी कंपनी बनली. नंतर त्यांनी हायड्रोलिक्समध्ये प्रवेश केला आणि बेळगावमध्ये औद्योगिक क्षेत्रातील महत्वाचा पाया रोवला.

1959 मध्ये, जर्मनीतील बाबुराव पुसाळकर यांनी त्यांच्यासाठी व्होगेल अँड कंपनीच्या सहकार्याने हायड्रोलिक प्रेसच्या निर्मितीची व्यवस्था केली. भारतातील अशा प्रकारची पहिलीच प्रेस होती. या युनिट्सना अलीकडे शिपिंग, संरक्षण आणि अवकाश उद्योगांकडून भरीव ऑर्डर मिळू लागल्या आहेत.

मध्यंतरी अनगोळ आणि उद्यमबाग परिसरातील उद्योजकांनी उद्यमबाग च्या नामकरणाचा प्रस्ताव पुढे आला त्यावेळी या मार्गाला बाबुराव पुसाळकर यांचे नाव देण्याची मागणी केली. मात्र याकडे दुर्लक्ष करत बसवराज बोम्मई मार्ग असे नामकरण करण्यात आले होते. त्यामुळे अनेक उद्योजकांचा यावेळी हिरमोड झाला होता.

पंतप्रधानांनी आजच्या भाषणात बाबुराव पुसाळकर यांच्या योगदानाबद्दल केलेल्या उल्लेखामुळे डॅमेज कंट्रोल पॉलिसी राबविण्यात आल्याची चर्चाही सुरु आहे. खुद्द पंतप्रधानांनीच आपल्या भाषणात बाबुराव पुसाळकरांचे नाव घेतल्याने भविष्यात पुसाळकरांच्या योगदानाची दखल नक्कीच कर्नाटक सरकार घेईल, अशी शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.