Saturday, December 21, 2024

/

…अन् त्याने टिपला डोळ्याचे पारणे फेडणारा अप्रतिम झेल!

 belgaum

क्रिकेटमध्ये फक्त फलंदाजी आणि गोलंदाजीतच नाही तर क्षेत्ररक्षणातही कमाल करत साऱ्यांचे लक्ष वेधून घेता येते हे किरण तरळेकर या क्रिकेटपटूने व्हॅक्सिन डेपो मैदानावर सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेत सीमारेषेनजीक डोळ्याचे पारणे फेडणारा अप्रतिम झेल टिपण्याद्वारे सिद्ध केले आहे.

टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर सध्या श्री चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील एसआरएस हिंदुस्तान आणि साईराज वॉरियर्स या दोन संघांमध्ये काल शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान किरण तरळेकर याने क्षेत्ररक्षणातील अप्रतिम समय सूचकतेचे प्रदर्शन घडविताना सीमारेषेवर डोळ्याचे पारणे फेडणारा झेल टिपला.

झाले असे की फलंदाजांनी सीमारेषे बाहेर फटकाविलेला चेंडू किरण याने उंच उडी मारून हवेतच झेलला. मात्र चेंडू झेलण्याच्या प्रयत्नात आपण चेंडू हातात घेऊन सीमारेषा ओलांडणार आणि तसे झाल्यास तो षटकार ठरणार हे लक्षात येताच किरण याने चेंडू पुन्हा हवेत फेकून सीमारेषेबाहेर जात पुन्हा तो चेंडू फुटबॉल किक प्रमाणे मैदानात लाथाडला जो मैदानात असलेल्या त्याच्या सहकारी क्षेत्ररक्षकाने सफाईने पकडून संबंधित फलंदाजाला झेलबाद केले.Shree trophy

किरण तरळेकर याने दाखविलेले क्षेत्ररक्षणातील हे चापल्य आणि झेल घेण्याचे कौशल्य आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेशे होते. त्यामुळे दिवसभर या झेलाचीच चर्चा होताना दिसत होती.

किरण तरळेकर याने पकडलेल्या या अप्रतिम झेलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला असून किरणची सर्वत्र विशेष करून क्रिकेट प्रेमींमध्ये मुक्तकंठाने प्रशंसा होत आहे. सदर  व्हीडीओ देश विदेशात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.