रहदारी नियम भंग गुन्ह्यांचा दंड भरण्यासाठी राज्य सरकारने 50 टक्के डिस्काउंटची अर्थात सवलतीची ऑफर दिली असताना देखील बेळगाव शहरात ई -चलनाच्या माध्यमातून 6.28 लाख गुन्ह्यांपैकी फक्त 38 हजार 691 गुन्ह्यांचा निचरा झाला आहे. या पद्धतीने एकूण नोंद गुन्ह्यांपैकी फक्त 6.19 टक्के गुन्ह्यांचा दंड वसूल झाला आहे.
बेळगाव शहरात रहदारी नियम भंगाचे सहा लाख 28 हजार गुन्हे दाखल झाले असून ज्यांचा दंड प्रलंबित आहे या गुन्ह्यांपैकी आता 38 हजार 691 गुन्ह्यांचा दंड जमा झाल्यामुळे ते रद्द करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांच्या माध्यमातून 76 लाख 12 हजार 950 रुपयांचा दंड रहदारी पोलिसांकडे जमा झाला आहे.
बेळगाव शहरातील रहदारी नियमांचे भंग करणाऱ्या वाहनांमध्ये सर्वाधिक नियम भंग दुचाकी वाहनांकडून झाला असून याप्रकरणी एकूण 6.28 लाख गुन्हे नोंद झाले आहेत. गुन्हे करणाऱ्या वाहनांमध्ये बेळगाव आरटीओ कार्यालय, गोकाक, चिक्कोडी, बैलहोंगल आणि शेजारील गोवा व महाराष्ट्र राज्य या ठिकाणच्या नोंदणीकृत वाहनांचा समावेश आहे.
शहरात रहदारी नियम भंगाचा दंड प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. हेल्मेट -4.12 लाख गुन्हे, सिग्नल तोडणे -1.20 लाख गुन्हे, ट्रिपल सीट दुचाकी चालवणे -45245 गुन्हे आणि इतर 51205 गुन्हे.
या सर्व गुन्ह्यांसाठी एकूण सुमारे 26 कोटी रुपये इतका रहदारी नियम भंगाचा दंड वसूल होणे बाकी आहे. यासाठीच सरकारने काल 11 फेब्रुवारीपर्यंत दंडाच्या रकमेत 50 टक्के सूट दिली होती. मात्र तरीही बहुसंख्य वाहन चालकांनी दंड भरण्यास पुढाकार घेतलेला नाही.