जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी मी शहापूरसह बेळगावला विसरलेलो नाही. वर्षातून किमान दोन वेळा मी बेळगावला येत असतो. माझ्या तीन बहिणी, भाऊ, काका येथेच आहेत. आम्ही सर्व ठाणेदार मंडळी भेटत असतो. बेळगावचे महत्त्व, बेळगावची माती, बेळगावची भाषा, येथील माणसं आणि बेळगावची संस्कृती यांचा मला कधीच विसर पडलेला नाही असे मत बेळगावकर असलेले अमेरिकेचे खासदार श्री ठाणेदार यांनी व्यक्त केले.
मराठा मंदिर आणि विविध संघ संस्था संघटनांच्या वतीने अमेरिकेचे खासदार श्री ठाणेदार यांचा सत्कार केला.कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठा मंदिराचे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना आणि स्वागत मराठा मंदिराचे सचिव बाळासाहेब काकतकर व्यासपीठावर वकील सुधीर चव्हाण नारायण खांडेकर, नेमिनात कंग्राळकर,नागेश तरळे,विश्वास घोरपडे,एल एस होनगेकर,नागेश झंग्रुचे,नेताजी जाधव शिवाजी हांगिरकर आदी उपस्थित होते.रवी पाटील यांनी सूत्रसंचालन केले चंद्रकांत गुंडकल यांनी आभार मानले.
खासदार डॉ. श्रीनिवास ठाणेदार म्हणाले की, मी अमेरिकेत जे करू शकलो त्याची सुरुवात या सुंदर बेळगाव शहरांमध्ये झाली. चिंतामणराव हायस्कूलमध्ये मी माध्यमिक शिक्षण घेतले. आपण आपल्या संस्कृतीत देवाच्या बरोबरीने शिक्षकांचा, गुरूंचा आदर करतो. माझ्या शाळेतील शिक्षकांनी मला जे शिक्षण दिले ते आयुष्यभर मला पुरले इतके आहे. आज मी जो कांही आहे तो माझ्या शिक्षकांमुळे आहे. तेंव्हा त्याप्रमाणे आपल्या संस्कृतीत आई-वडिलांचे महत्त्व जाणतो. माझी आई मुळची कोल्हापूरची तिने कठीण परिस्थितीत आमचे घर सांभाळले.
ते म्हणाले की आम्हाला शिक्षण देऊन पदवीधर केले. ‘दिलेला शब्द पाळायला पाहिजे’ हे माझ्या आईचे मला कायम सांगणे असायचे. कितीही कठीण परिस्थिती आली तरी खचून जायचं नाही असं ती सांगायची. कठीण परिस्थितीवर मात करण्याची तिची शिकवण मी अंगीकारली. त्यानंतर आयुष्यात खूप चढउतार आले. मात्र प्रत्येक वेळी मला माझ्या आईचे शब्द आठवायचे असे सांगून कठीण परिस्थिती समोर हार पत्करायची नाही. येणाऱ्या अवघड परिस्थिती अथवा अपयशावर मात करता आली पाहिजे, असे डॉ. ठाणेदार म्हणाले.
यावेळी मराठा बँकेच्या वतीनेही सत्कार केला बँकेचे अध्यक्ष दिगंबर पवार,महिला आघाडीच्या रेणू किल्लेकर,नीना काकतकर,बी एस पाटील,नारायण किटवाडकर, श्रीकांत देसाई,सुहास किल्लेकर आदी उपस्थित होते.