बेळगाव जिल्हा प्रशासन आणि महापालिकेतर्फे येत्या रविवार दि 19 फेब्रुवारी रोजी साजरा केल्या जाणाऱ्या शिवजयंती कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमधील मान्यवरांच्या यादीत शहराच्या प्रथम नागरिक असणाऱ्या महापौरांना सर्वात शेवटी नगण्य स्थान देण्याचा तर उपमहापौरांचे नावच निमंत्रण पत्रिकेत नसल्याचा प्रकार समोर आला असून त्यामुळे मराठी भाषिक नगरसेवकांसह शहरवासीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जिल्हा प्रशासन व महापालिकेतर्फे येत्या रविवारी आयोजित शिवजयंती कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर शहराच्या प्रथम नागरिक शोभा सोमनाचे यांचे नाव सर्वात शेवटी नमूद करण्यात आले आहे, तर उपमहापौर रेश्मा पाटील यांचे नावच निमंत्रण पत्रिकेत नाही विशेष म्हणजे बुडा अध्यक्ष संजय बेळगावकर यांचे नांव महापौरांच्या आधी असल्याने मराठी भाषिक नगरसेवकांसह शहरवासीयांमध्ये तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
कर्नाटकात 2012 पासून दर 19 फेब्रुवारी रोजी शासकीय पातळीवर शिवजयंती साजरी केली जात आहे. त्यानुसार यंदाही ती साजरी केली जात असली तरी कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रितांच्या यादीत महापालिका आयुक्त डाॅ. रुद्रेश घाळी यांचे नांव आहे, मात्र महापौरांबाबत पक्षपाती भूमिका घेण्यात आली आहे. बेळगाव महापौर -उपमहापौर पदाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने मराठी भाषिकांना प्राधान्य दिले असले तरी शासकीय शिवजयंती कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर नांव नमूद करताना महापौर आणि उपमहापौरांवर अन्याय झाला आहे. महापौरांपेक्षा आयुक्त आणि बुडा अध्यक्षांनाच जास्त महत्त्व देण्यात आले आहे.
याखेरीस कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका देखील केवळ कन्नड भाषेत तयार करण्यात आली आहे. खरे तर महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने नूतन महापौर व उपमहापौराना शासकीय शिवजयंती कार्यक्रमाला निमंत्रण देणे व कार्यक्रमात त्यांना अग्रस्थान देणे आवश्यक आहे. तसेच प्रशासनाने ही चूक दुरुस्त करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
महापौर आणि उपमहापौरांना शिवजयंती कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतील मान्यवरांच्या यादीतून डावलने अथवा नगण्य स्थान देण्याबरोबरच या शिवजयंती कार्यक्रमाचे संपूर्ण कानडीकरण करण्यात आले असल्याचे समजते. कोरोनामुळे गेले तीन वर्षे शासकीय शिवजयंती साधेपणाने साजरी झाली. मात्र यंदा शिवजयंती निमित्त शोभायात्रा, व्याख्यान व विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.