बेळगाव लाईव्ह : 2009 ते 2019 दरम्यान लोकसभेवर पुन्हा निवडून आलेल्या देशातील 71 खासदारांच्या संपत्तीत सरासरी 286 टक्क्यांनी वाढ झाली असून यामध्ये कर्नाटकातील भाजपचे रमेश चंदप्पा जिगजिनगी यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ नोंदवली आहे, भाजपचे खासदार रमेश जिनाजिनगी यांच्या संपत्तीत 2009 ते 2019 या कालावधीमध्ये संपत्तीत सर्वाधिक वाढ झाल्याचं असोशिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) ने प्रकाशित केलेल्या अहवालातून स्पष्ट झालं आहे.
रमेश जिगजिनगी यांची एकूण मालमत्ता जी 2009 मध्ये सुमारे 1.18 कोटी रुपये होती, ती 2014 मध्ये 8.94 कोटी रुपये तर 2019 मध्ये 50.41 कोटी रुपयांवर गेली आहे. त्यांच्या एकूण संपत्तीत 4,189 टक्क्यांनी वाढ झाली. असोशिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) ने प्रकाशित केलेल्या अहवालातून ही बाब उघडकीस आली आहे.
जिनाजिनगी यांनी लोकसभा निवडणूकीत सादर केलेल्या शपथपत्रातूनही ही टक्केवारी उघडकीस आली आहे. जिनाजिनगी यांनी जुलै 2016 ते मे 2019 या कालावधीत पाणीपुरवठा व स्वच्छता या खात्याचे राज्यमंत्री म्हणूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये काम पाहिलेलं आहे.
एडीआर-नॅशनल इलेक्शन वॉचच्या अहवालानुसार, कर्नाटकातील भाजपचे आणखी एक खासदार, पीसी मोहन यांनी 2009 ते 2019 दरम्यान त्यांच्या मालमत्तेत वाढ नोंदवलेल्या संसदेच्या पहिल्या 10 सदस्यांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले.
2019 मध्ये बेंगळुरू सेंट्रल मतदारसंघातून लोकसभेवर पुन्हा निवडून आलेले मोहन यांनी 2009 च्या लोकसभा निवडणुकीत सुमारे 5.37 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. 10 वर्षात हा आकडा 75.55 कोटी रुपयांपर्यंत वाढला असून त्यात 1,306 टक्क्यांची वाढ झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.