आत्तापर्यंत ज्यांचे उत्पन्न 5 लाखांपर्यंत होते त्यांना आयकर भरावा लागत नव्हता. आताही मर्यादा 7 लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव काळामधील केंद्रीय अर्थसंकल्पातील ही सर्वात महत्वाची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज बुधवारी केली आहे. नव्या कर रचनेत हा बदल केला गेला असून मध्यमवर्गीयांसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी आहे.
नव्या करश्रेणीत 2.5 लाखांपासून स्लॅब सुरू झाले होते. आता स्लॅब्जची संख्या 5 पर्यंत कमी करण्यात आली आहे. त्यानुसार काय बदल झाले? 3 लाखांपर्यंत -कोणताही कर नाही, 3 ते 6 लाख -5 टक्के, 6 ते 9 लाख -10 टक्के, 9 ते 12 लाख -15 टक्के, 12 ते 15 लाख -20 टक्के, 15 लाखाहून अधिक -30 टक्के. आयकरची मर्यादा ही सरसकट 7 लाखांपर्यंत करण्यात आली आहे. तसेच 3 ते 6 लाख उत्पन्नावर 5 टक्के कर असणार आहे. 6 ते 9 लाख उत्पन्नावर 10 टक्के कर आकारला जाईल. 9 ते 12 लाख उत्पन्न असेल तर 15 टक्के आणि 15 लाखापेक्षा ज्यांचे उत्पन्न जास्त आहे त्यांना 30 टक्के कर असणार आहे.
ज्येष्ठ नागरिक खाते योजनेची मर्यादा 4.5 लाखांवरून 9 लाख इतकी करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेत ज्येष्ठ नागरिक 9 लाख रुपये जमा करू शकतील. तर संयुक्त खात्याची मर्यादा 15 लाख करण्यात आली आहे. प्राप्तिकर सवलत मर्यादा 2.50 लाखांवरून 5 लाख रुपये करण्यात यावी अशी अपेक्षा अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली होती. मागच्या कांही वर्षांपासून टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता. आजच्या अर्थसंकल्पात तो करण्यात आला आहे. नवी कर व्यवस्था स्वीकारणाऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात यावर प्रकाश टाकला. गेल्या 2020 मध्ये 2.5 लाखांपासून सुरू झालेल्या 6 आयकर स्लॅब सोबत नवीन व्यक्तिगत आयकर व्यवस्था सुरू करण्यात आली होती. आता या व्यवस्थेला कर प्रणालीत रूपांतरित करण्याचा प्रस्ताव आहे. या स्लॅबची संख्या कमी करून 5 करण्यात येत आहे आणि आयकर सवलतीची मर्यादा 3 लाख करत आहे असे सितारमण यांनी सांगितले. जुनी कर रचना डिफॉल्ट असणार असल्याचे सांगून नव्या कर रचनेसाठीच हे बदल करण्यात आले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
देशात 50 विमानतळ उभारण्यात येणार, गरिबांच्या घरासाठी 79 हजार कोटींचा निधी, मोफत अन्नधान्य वाटप योजना 80 कोटी लोकांना लाभ, 2 लाख कोटींचा खर्च करून 44 कोटी 6 लाख नागरिकांना जीवन विम्याचे कवच अशा अन्य कांही घोषणा केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी आज केल्या.