Wednesday, January 22, 2025

/

खानापूरसाठी समितीमधून ७ जण इच्छुक

 belgaum

बेळगाव लाईव्ह : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. एकीचा निर्धार, बैठका आणि निवडणुकीसाठी इच्छुकांचे अर्ज मागविण्याची प्रक्रिया सकारात्मक पद्धतीने खानापूर समितीने सुरु केली असून खानापूर समितीने केलेल्या आवाहनानुसार एकूण ७ इच्छुकांचे अर्ज समिती कार्यकारिणीकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.

मुरलीधर गणपतराव पाटील, निरंजन उदयसिंह सरदेसाई, गोपाळराव मुरारी पाटील, पांडुरंग तुकाराम सावंत, आबासाहेब नारायणराव दळवी, विलासराव कृष्णाजी बेळगावकर, रुक्माण्णा शंकर झुंजवाडकर, या सात जणांनी आपली नावे समिती कार्यकारिणीकडे ५१ हजार रुपये रोख आणि अर्ज सादर करून नोंद केली आहेत.

समिती कार्यकारिणी बैठकीत १० फेब्रुवारी ची अंतिम मुदत इच्छुकांची नावे नोंदविण्यासाठी देण्यात आली होती. यानुसार आजपर्यंत एकूण सात जणांनी उमेदवारीसाठी आपली नावे खानापूर शिवस्मारक येथे खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे सचिव सीताराम बेडरे यांच्याकडे नोंदविली आहेत.

अधिकृत उमेदवार निवड प्रक्रियेसाठी जनमत घेण्यात येणार आहे. यासाठी पुढील महिनाभर तालुक्यातील गावोगावी संपर्क दौरा आखण्यात आला आहे. यादरम्यान प्रत्येक खेडोपाड्यात जाऊन जनतेच्या गाठीभेटी घेऊन उमेदवारांसंदर्भात कानोसा घेण्यात येणार आहे. समिती नेते, समिती कार्यकारिणी आणि पदाधिकारी यांच्या संयुक्त सहभागाने हा दौरा आखण्यात आला आहे.Khanapur mes

या दौऱ्यादरम्यान प्रत्येक इच्छुकाने समितीचे बळ वाढविण्यासाठी आपापल्यापरीने कार्यकर्त्यांची एकजूट करावयाची आहे. अधिकाधिक कार्यकर्ते समितीशी जोडले जावेत, हि अट बंधनकारक असेल. प्रत्येक संपर्क दौऱ्यात इच्छुकांनी कार्यकर्त्यांसमवेत सहभागी होणे आवश्यक आहे. यानंतर पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात येणार आहे.

या बैठकीत डिपॉझिट संदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. डिपॉझिटची रक्कम ठरविण्याचा अधिकार इच्छुकांना नसेल. तसेच इच्छुकांनी समितीकडे देणगीदाखल दिलेले ५१ हजार रुपयेही परत केले जाणार नाहीत.

इच्छुकांनी समितीकडे देणगीदाखल दिलेला ५१ हजार रुपयांचा निधी संपर्क दौरा आणि निवडणुकीच्या खर्चासाठी वापरण्याचा निर्णय कार्यकारिणीने घेतला आहे. या साऱ्या प्रक्रियेनंतर खानापूर समितीतून अधिकृत उमेदवाराची घोषणा केली जाणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.