बेळगाव लाईव्ह : येळळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने रविवारी (दि. 19 फेब्रुवारी) होणाऱ्या 18 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनास सिनेसृष्टीतील आणि छोट्या पडद्यावरील ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी या उपस्थित राहणार आहेत.
साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात त्यांची मुलाखत होणार आहे. अनेक मराठी-हिंदी चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनय कौशल्याने चित्रपट सृष्टी गाजविली आहे. छोट्या पडद्यावरील अनेक वर्षे गाजलेल्या ‘चार दिवस सासूचे” आणि ‘होणार सुन मी ह्या घरची’ यासारख्या मालिकांमधील त्यांच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातले.
रंगभूमीवरील व चित्रपटांतील ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून कारकीर्द गाजवत असलेल्या रोहिणी हट्टंगडी यांनी विविध भाषांमधील नाटकांतून आजवर कामे केली आहेत. प्रेमचंदांच्या ‘गोदान’वर आधारित ‘होरी’ नाटकातील ‘धनिया’ची भूमिका, ‘इबारगी’ या जपानी ‘काबुकी’ पद्धतीच्या नाटकातील मावशीची भूमिका,
कर्नाटकातील यक्षगान शैलीतील ‘भीष्मविजय’मधील ‘अंबे’ची भूमिका ‘अंधा युग’मधील ‘गांधारी’ची भूमिका अशा विविध भूमिका त्यांनी केल्या. या प्रशिक्षणाचाच एक भाग म्हणून ‘एका म्हाताऱ्याचा खून’ या नाटकाचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे.
अनेक पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या रोहिणी हट्टंगडी यांनी अनेक चित्रपट, नाटके, दूरदर्शन मालिका अशा विविध क्षेत्रांत प्रेक्षकांना नवनवीन आविष्कार दाखविले असून येळ्ळूर साहित्य संमेलनात त्यांचे प्रमुख आकर्षण असणार आहे.