बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात ठिकठिकाणी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विकासकामे करण्यात आली आहेत. मात्र या विकासकामात गौडबंगाल असल्याचा आरोप रमाकांत कोंडुसकर यांनी केला.
आज बेळगावमध्ये शिवसन्मान पदयात्रेसंदर्भात माहिती देण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी दक्षिण भागात राबविण्यात आलेल्या स्मार्ट सिटी कामकाजावर त्यांनी ताशेरे ओढले.
स्मार्ट सिटी अंतर्गत हाती घेण्यात आलेले रस्ते अजूनही अर्धवट स्थितीत आहेत. अनेक ठिकाणचे रस्ते उखडलेल्या स्थितीत दिसून येत आहेत. गरज नसलेल्या ठिकाणी वारंवार डांबरीकरण करून रस्ते बनवून पैशांची उधळपट्टी सुरु आहे. सातत्याने एकच रस्ता विविध कारणांसाठी खणून पुन्हा पुन्हा त्या रस्त्याचे डांबरीकरण केले जात आहे. अनेक ठिकाणच्या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. बी. एस. येडियुरप्पा मार्गासह अनेक ठिकाणी डेकोरेटिव्ह पथदीप बसविण्यात आले आहेत. मात्र रस्ते आणि दुभाजक एकामागून एक खणून पुन्हा पुन्हा तीच तीच कामे करण्यात आल्याने सध्या हे पथदीप देखील पुन्हा काढण्यात येणार आहेत. साधारण ६० ते ८० हजारांच्या घरात किंमत असलेल्या या पथदीपांची उभारणी गेल्या २ वर्षांपूर्वीच झाली आहे. पथदीप उभारल्यानंतर अनेक काळ ते बंद अवस्थेत होते. आता पुन्हा ते पथदीप काढण्याची तयारी असून या साऱ्या प्रक्रियेत जनतेच्या पैशांची उधळपट्टी केली जात असल्याचे निदर्शनात येत आहे.
या भागाच्या लोकप्रतिनिधींनी येथील जनतेला गृहीत धरले आहे. या भागाचे विकासकाम जरी आमदार निधीतून होत असले तरी आमदार निधी हा जनतेच्या पैशातूनच उभा राहतो, हे हि तितकेच खरे आहे. यामुळे संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार लोकप्रतिनिधींना याबाबत जाब विचारणे गरजेचे आहे.
जनतेच्या मतांवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष पुरविणे गरजेचे होते. मात्र एकंदर या भागातील विकासकाम पाहता यामागे मोठे गौडबंगाल असल्याचे रमाकांत कोंडुसकर म्हणाले.