बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीत पुन्हा बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता स्थापन करण्यासाठी आणि मराठी माणसाची ताकद दाखवून देण्यासाठी प्रत्येक मराठी भाषिक पेटून उठला आहे. अद्याप शहर, मध्यवर्ती आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने उमेदवार निवडला नसून समिती नेत्यांनी लवकरात लवकर उमेदवार जाहीर करावा अशी मागणी मराठी भाषिकातून होत आहे.
आज श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आणि माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांच्याकडे दक्षिण मतदार संघातून उमेदवारी मिळावी यासाठी अर्ज सादर केला आहे. मजबूत कार्यकर्त्यांचे संघटन, सामाजिक कार्यासाठी करण्यात आलेली आंदोलने, सामाजिक प्रश्नाची असलेली जाण या सर्व अनुषंगाने रमाकांत कोंडुसकर यांनी बेळगाव मध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची संघटना उभी केली आहे.
महाराष्ट्र एकीकरण समिती गेल्या अनेक वर्षांपासून मराठीसाठी लढा देत आहे. या लढ्याशी मूळ बांधीलकी जपत रमाकांत कोंडुसकर यांनी समिती बरोबर कार्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या कर्नाटक महाराष्ट्र सीमावादात रस्त्यावरच्या लढाईत देखील रमाकांत कोंडुसकर यांनी आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांसोबत तन-मन-धनाने उत्स्फूर्त सहभाग घेत, स्वतःला झोकून देत कार्य केले आहे. मराठी माणसाच्या न्याय हक्काच्या लढाईत सर्व पातळीवर संघर्ष करण्याची तयारी दाखवत या संघर्षाचा एक भाग म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दक्षिण मतदार संघातून उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी आज अर्ज सादर केला आहे.
रमाकांत कोंडुसकर यांच्या मातोश्रींनी एपीएमसी मध्ये उपाध्यक्षपद भूषविले होते. एपीएमसी मध्ये दोन वेळा महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता अबाधित राखण्यासाठी त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते. रमाकांत कोंडुसकर हेदेखील समिती लढ्यात स्वतःला झोकून देत मागील दोन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत समितीच्या प्रचारार्थ रस्त्यावर उतरले. यावेळी समिती उमेदवाराला सव्वा लाखाहून अधिक मते मिळाली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत व्यासपीठावर भाषण करून श्रीराम सेना हिंदुस्थानची ताकद त्यांनी दाखवून दिली होती. आणि हीच ताकद पुढे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी लावली. याचप्रमाणे महानगरपालिका निवडणुकीत देखील उत्तर मतदार संघाच्या व्याप्तीत येणाऱ्या दोन उमेदवारांना विजयी करण्यासाठीही रमाकांत कोंडुसकर यांचा मोलाचा वाटा आहे. भांदूर गल्ली आणि शिवाजीनगर या भागातील उमेदवाराला निवडून आणण्यासाठी रमाकांत कोंडुसकर यांनी कसोशीने प्रयत्न केले. यासह इतर उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांनी त्यांचाही प्रचार केला.
महाराष्ट्र एकीकरण समितीत मागील काही वर्षात पडलेली फूट आता हळूहळू मिटत चालली आहे. अनेक मराठी नेते पुन्हा समितीच्या प्रवाहात येत आहेत. यामुळे पुन्हा मराठी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीला बळकटी मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत हीच बाब समितीच्या पथ्यावर पडणार आहे. दुभंगलेली मने आणि विचार आता एक होऊ पाहत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत हीच बाब हेरून समिती नेत्यांनी विजयाचे समीकरण राबविण्यासाठी रमाकांत कोंडुसकर यांच्या उमेदवारीचा विचार करणे आवश्यक आहे. दक्षिण मतदार संघात केवळ मराठी भाषिकांची मतेच नव्हे तर मराठी व्यतिरिक्त इतर भाषिकांची मतेही खेचून आणण्याची क्षमता कोंडुसकरांमध्ये आहे. याचप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रवाहात इतर संघ-संस्था आणि लहान मोठ्या घटकांनाही समाविष्ट करण्याची ताकद त्यांच्यात आहे. शहरात महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता आणण्यासाठी रमाकांत कोंडुसकर ‘मॅन-मनी-मसल’ (Man-Money-Muscle) हि त्रिसूत्री वापरून नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
या सर्व गोष्टींचा सर्वंकष विचार करून तीन महिने आधीच रणनीती ठरविण्यासाठी दक्षिण मधून तगडा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्यासाठी समिती नेत्यांनी विचार करणे गरजेचे आहे. म. ए. समिती हि कोणत्या अनुदानावर किंवा राष्ट्रीय पक्षांमध्ये ज्या पद्धतीने निधी जमा होतो अशा निधीवर उभी नाही. लोकवर्गणीतून आजवर अनेक लढे समितीने लढले आहेत. या प्रवासात आजवर रमाकांत कोंडुसकरांनी हुतात्मा स्मारक, लोकसभा पोटनिवडणूक यासारख्या अनेक गोष्टींमध्ये सढळ हस्ते आर्थिक मदत केली आहे. शिवाय महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्यत्व स्वीकारून त्यांनी समितीसाठी तन-मन-धनाने कार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळे ज्या पद्धतीने तालुका म. ए. समितीने पोषक आणि पूरक वातावरण निर्माण केले आहे याच धर्तीवर मध्यवर्ती आणि शहर समिती नेत्यांनी विचार करून एका मतदार संघात एकच अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवून पुन्हा एकदा बेळगाववर समितीचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करण्याची गरज आहे.