ग्रामपंचायतीच्या खुल्या जागेत केलेल्या अतिक्रमणा विरोधात आवाज उठवणाऱ्या युवकावर एकाच कुटुंबातील 5 -6 जणांनी हल्ला करून त्याला जबर मारहाण करण्याद्वारे जखमी करण्यात आल्याची घटना आज सकाळी धामणे (ता. जि. बेळगाव) गावामध्ये घडली.
मारहाणी जखमी झालेल्या युवकाचे नांव सागर रामा बाळेकुंद्री (वय 36, रा. बसवान गल्ली, धामणे वडगाव) असे आहे. आपल्याला गावातील शंकर लक्ष्मण बाळेकुंद्री आणि जोतिबा उर्फ बाळू लक्ष्मण बाळेकुंद्री कुटुंबीयांनी मारहाण केल्याचा सागर याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धामणे वडगाव येथील बसवान गल्लीमध्ये असलेल्या ग्रामपंचायतीच्या खुल्या जागेवर अतिक्रमण करून ती जागा हडप करण्याचा घाट काहींनी रचला आहे. यामध्ये शंकर बाळेकुंद्री व बाळू बाळेकुंद्री यांचा हात असल्याचा आरोप आहे.
बसवान गल्लीमधील लोकांना सार्वजनिक कार्यक्रम करण्यासाठी सभामंडप अथवा खुली जागा नाही. त्याकरिता बसवान गल्ली अंगणवाडी शेजारी असलेली अतिक्रमण करण्यात आलेली ग्रामपंचायतीची खुली जागा विधायक कार्यासाठी बलभीम तरुण युवक मंडळाच्या नावावर दाखल करून उतारा द्यावा, अशी विनंती एका निवेदनाद्वारे कांही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीकडे करण्यात आली होती.
तसेच अतिक्रमणाबाबत तक्रारही करण्यात आली होती. ही तक्रार सागर बाळेकुंद्री यानेच केल्याच्या रागातून आज सकाळी दुकानासमोर पेपर वाचत बसलेल्या सागर याला शंकर बाळेकुंद्री यांनी त्या जागेत तुझे इतके का स्वारास्य? असा जाब विचारला. त्यावरून उभयतात बाचाबाची झाल्यानंतर त्याचे पर्यवसान शंकर व बाळू बाळेकुंद्री यांच्यासह पाच-सहा जणांनी सागर बाळेकुंद्री याला जबर मारहाण करण्यामध्ये झाले. सदर मारहाणीनंतर सागर याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार होण्याबरोबरच वैद्यकीय कायदेशीर गुन्हा (एमएलसी दाखल) करण्यात आला आहे.
एकंदर घटनेसंदर्भात बेळगाव लाईव्हला माहिती देताना सागर बाळेकुंद्री यांनी सांगितले की, बसवान गल्ली येथे असलेल्या ग्रामपंचायतीच्या खुल्या जागेत शंकर लक्ष्मण बाळेकुंद्री व जोतिबा उर्फ बाळू लक्ष्मण बाळेकुंद्री यांनी बेकायदेशीररित्या अतिक्रमण करून शेड उभारले आहे. या संदर्भात पंचायतीकडे निवेदनाद्वारे तक्रारी करण्यात आली आहे. मात्र महिन्यावर झाला तरी अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. दरम्यान या अतिक्रमणासंदर्भात काल रात्री एका ग्रामपंचायत सदस्याला देखील बाळेकुंद्री कुटुंबीयांनी धमकावले आहे.
त्यानंतर आज सकाळी मी दुकानासमोर पेपर वाचत बसलो असताना त्या जागेबद्दल तुला काय अडचण आहे? अशी विचारना करत शंकर बाळेकुंद्री यांनी प्रथम माझ्यावर हात उगारला. त्यानंतर त्यांच्या घरातील स्त्री-पुरुषांनी येऊन मला मारहाण केली असे सांगून मला मारहाण करणाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई केली जावी, अशी मागणी सागर बाळेकुंद्री याने केली आहे.