बेळगाव लाईव्ह : बेळगावसह संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्रात सामील व्हावा हि तळमळ प्रत्येक सीमावासीय मनाशी बाळगून आहे. आणि यातही काही ध्येयवेडी माणसे असतात जी यत्र-तत्र-सर्वत्र केवळ आणि केवळ सीमाप्रश्नाची सोडवणूक या एकाच ध्येयाने प्रेरित असतात. बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीची विचारधारा बाळगणाऱ्या समितीनिष्ठ विवेक कुट्रे हा कार्यकर्ताही या ध्येयवेड्या सीमावासियातील एक!
जन्मतःच महाराष्ट्र एकीकरण समितीशी नाळ जोडल्या गेलेल्या विवेक कुट्रे हे नेहमीच सीमाप्रश्नाशी बांधिलकी जपत आले आहेत. सध्या जाधव नगर येथे वास्तव्यास असलेल्या विवेक कुट्रे यांनी गडकोट मोहिमेत सहभाग घेतला. धारकरी म्हणून गडमोहिमेत सहभागी झालेल्या विवेक कुट्रे यांनी सीमाप्रश्नाचा आवाज गडकिल्ल्यांवर गाजवला.
बेळगावसह संपूर्ण सीमाभाग संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे! अशा दणदणीत आणि खणखणीत आवाजात सह्याद्रीच्या पर्वत रांगेत घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. त्यांच्या या घोषणेचा व्हिडीओ सीमाभागात वायरल झाला. आणि विवेक कुट्रे यांच्याबद्दल सीमाभागात उत्सुकता निर्माण झाली.
एका सर्वसामान्य कुटुंबात वाढलेले विवेक कुट्रे हे नेहमीच परखडपणे आपले विचार आणि मते मांडत आले आहेत. निस्वार्थी मनाने नेहमीच त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीशी निष्ठा दाखविली. शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे दीपक दळवी यांचे ते मोठे चाहते आहेत. समितीचा कोणताही मोर्चा असो किंवा कोणतेही आंदोलन विवेक कुट्रे हे नेहमीच प्रत्येक ठिकाणी सक्रिय सहभाग नोंदवतात. समस्त सीमावासीयांसारखीच महाराष्ट्रात जाण्याची तळमळ प्रत्येकवेळी बोलून दाखवतात. समिती नेत्यांमध्ये विवेक कुट्रे यांच्याबद्दल एक विशिष्ट अशी आपुलकी आहे.
त्यांचे निस्वार्थी मत आणि परखड विचार मांडण्याची वृत्ती यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. कुणाचीही आणि कसलीही तमा न बाळगता गडकोट मोहिमेत त्यांनी ज्यापद्धतीने सीमाप्रश्नासंदर्भात घोषणा दिली त्यावरून त्यांची समितीनिष्ठा आणि महाराष्ट्रात जाण्याची तळमळ पुन्हा एकदा अधोरेखित झाली.