बेळगाव लाईव्ह विशेष :सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बेळगाव भेटीची तयारी जोरदार सुरू आहे. बेळगाव शहरातल्या कोणत्या महत्त्वाच्या रस्त्यावरून त्यांचा रोड शो होणार? हे अद्याप ठरलेले नाही. त्यामुळे रोड शो होईल अशी शक्यता असणाऱ्या बहुतेक महत्त्वाच्या रस्त्यांची डागडुजी सुरू आहे. या रस्त्यावरून जाताना वाहने उड्या मारायची, सर्वसाधारणपणे चालताना माणसाला उड्या मारायला लागायचे आणि व्यवस्थित जाताही येत नव्हते असे सारे रस्ते आता गुळगुळीत झाले आहेत.
मोदीजी भले कोणत्याही रस्त्याने रोड शो करू देत मात्र त्यांच्या निमित्ताने बहुतेक बरेचसे कनेक्टेड रस्ते गुळगुळीत आणि तुळतुळीत झाले आहेत. हे बेळगावकरांच्या दृष्टीने समाधानाचे ठरले आहे. त्यामुळेच सर्वसामान्य बेळगावकर म्हणतोय मोदीजी महिन्यातून एकदा तरी बेळगावला येऊन जावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वशक्तीमान आणि पावरफुल व्यक्तिमत्त्व म्हणून जगभरात ओळखले जातात.
2014 नंतर मोदीजींचा करिष्मा साऱ्या देशाला पाहायला मिळाला. त्यापूर्वी त्यांच्या गुजरात मॉडेलने संपूर्ण देशात त्यांचा महिमा ऐकायला मिळत होता. मात्र मोदीजी पंतप्रधान झाले आणि सलग त्यांची दुसरी टर्म ही गाजली. आता तिसऱ्या टर्मची तयारी सुरू आहे. त्याची पूर्वतयारी परीक्षा म्हणजेच कर्नाटकाची निवडणूक, असे बोलले जात असताना मोदीजींनी कर्नाटकातील स्वतःच्या रॅलीसाठी बेळगावची निवड केली. हे बेळगावकरांच्या दृष्टीने समाधानाचे आहे. भाजप पक्षाचे निवडणुकीचे गणित आणि मोदीजींच्या येण्याने भाजपला किती फायदा होणार? हा सारा भाजपचा वैयक्तिक मामला…. मात्र बेळगावकरांचा एक वेगळाच फायदा होऊ लागला आहे…
पंतप्रधान नरेंद्र मोदी या सर्वशक्तिशाली व्यक्तिमत्त्वाच्या येण्याची तयारी पाहिली तर बेळगावचे रस्ते गुळगुळीत आणि तुडतुळीत झाले आहेत… त्यामुळे मोदीजींनी जर महिन्या दोन महिन्यातून एकदा बेळगावला येण्याची फक्त घोषणा जरी केली तरी बेळगावकरांच्या वाट्याला येणारे दुःख सहसा निघून जाईल…. अशीच सर्वसामान्य नागरिकांची भावना आहे.
मोदीजींनी 2014 मध्ये सर्वप्रथम भारत देशाची सूत्रे हाती घेतल्यानंतर काही शहरांची परिस्थिती सुधारण्यासाठी स्मार्ट सिटी ही योजना अस्तित्वात आणली. स्मार्ट सिटी मध्ये पहिल्या फेजमध्येच बेळगावचा समावेश झाला, आणि बेळगाव स्मार्ट होणार याच्या प्रतीक्षेत बेळगावकर आहेत. स्मार्ट सिटीच्या नावाखाली रस्ते बंद, वेगवेगळ्या रस्त्यांवर सातत्याने चाललेली कामे आणि गुळगुळीत रस्त्यांपेक्षा खड्डेच अधिक अशा साऱ्या परिस्थितीला 2015 ते 16 पासून बेळगावकर तोंड देत आहेत. अशा साऱ्या परिस्थितीत अनेक केंद्रीय नेते आले आणि गेले, ते कोणत्या रस्त्याने जाणार हे ठरले होते त्यामुळे ठराविक रस्ते गुळगुळीत होत होते, मात्र मोदीजींच्या येण्याच्या निमित्ताने बेळगाव शहरातील अनेक रस्ते गुळगुळीत झाले. याचे समाधान भाजप पेक्षा सर्वसामान्य बेळगाववासियांना आहे.
या निमित्ताने मोदीजींचे आभार मानावे तितके थोडे अशी प्रतिक्रिया अनेक सर्वसामान्य बेळगावकरांनी बेळगाव लाईव्ह कडे व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बेळगाव दौऱ्याने कोणाचा फायदा होणार? कोणाला तिकीट मिळणार? कोण अविरत प्रयत्न करतायेत? या साऱ्या परिस्थितीत सर्वसामान्य बेळगावकर मात्र रस्ते सुस्थितीत आले आणि वेगवेगळ्या सुविधा मिळू लागल्या ,त्यामुळे मोदीजींनी वारंवार बेळगावला यावे अशीच भावना व्यक्त करत आहे.