बेळगाव लाईव्ह : येत्या २७ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बेळगावमधील नूतनीकरण करण्यात आलेल्या मध्यवर्ती रेल्वेस्थानकाच्या उद्घाटन समारंभासाठी बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर कर्नाटकच्या मुख्य सचिव वंदिता शर्मा यांनी प्रत्येक कार्यक्रम नीटपणे पार पाडण्यासाठी आवश्यक ती तयारी करावी, अशा सूचना दिल्या.
बुधवारी वंदिता शर्मा यांनी, पंतप्रधानांच्या राज्यातील बेळगाव आणि शिवमोगा दौऱ्यातील कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या तयारीबाबत जिल्ह्यातील उच्च अधिकाऱ्यांशी व्हिडिओ संभाषणाद्वारे तयारीचा आढावा घेतला.
या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांशी बोलताना त्या म्हणाल्या, पंतप्रधान कार्यालयाच्या निर्देशानुसार सुरक्षा व्यवस्था, शिष्टाचार आणि स्टेज बांधणीसह प्रत्येक काम निर्धारित वेळेत पूर्ण करावे.अंतिम कार्यक्रमाच्या यादीनुसार शेवटमध्ये काही बदल होऊ शकतात. हे लक्षात घेऊन आवश्यक ती तयारी जिल्हाधिकारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी करावी. आपत्कालीन वैद्यकीय सुविधा, सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी सर्व खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.असेही वंदिता शर्मा यांनी सांगितले.
पंतप्रधानांच्या हंगामी कार्यक्रम यादीनुसार, संबंधित विभाग, पंतप्रधान कार्यालय आणि एसपीजी यांच्याशी चर्चा करून कार्यक्रमाची तयारी आधीच सुरू करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या पथकाच्या निर्देशानुसार सुरक्षा व्यवस्था आणि बंदोबस्त केला जाईल, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.
यानंतर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांशी चर्चा करताना, मोठ्या संख्येने लोक सहभागी होणार असल्याने पार्किंग व जेवणाची व्यवस्था पुरेशी करण्यात यावी अशी सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केली.
यावेळी प्रादेशिक आयुक्त एम.जी.हिरेमठ, बेळगाव शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.संजीव पाटील आदी उपस्थित होते.