सोमवारी बेळगाव महापालिकेच्या महापौर उपमहापौर निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. कौन बनेगा महापौर उपमहापौर याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
प्रादेशिक आयुक्त डॉ एम जी हिरेमठ निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार असून सकाळी दहा वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार असून अर्ज दाखल केले जाणार आहेत अर्जांची छाननी झाल्यावर दुपारी तीन वाजता निवडणूक होणार आहे.
महापालिकेच्या सभागृहात एकूण 58 पैकी 35 नगरसेवक भाजपकडे असल्याने भाजपचा महापौर उपमहापौर होणार हे निश्चित आहे. महापौर उपमहापौर निवडण्यासाठी भाजप प्रभारी निर्मल कुमार सुराना यांनी भाजप आमदारांसह नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत महापौर आणि उपमहापौर पदासाठी इच्छुक असलेल्या नगरसेवकांची सुराना यांनी चर्चा करत मुलाखात घेतली.
महापौर पदासाठी दक्षिण भागातील वीणा जोशी,दीपाली टोपगी,शोभा सोमनाचे आणि सारिका पाटील या तर उपमहापौर पदासाठी रेश्मा पाटील या इच्छुक आहेत. उपमहापौर पदासाठी रेश्मा पाटील यांचे नाव जवळपास निश्चित असून महापौर पदासाठी मुख्य रस्सीखेच आहे.
महापौर पदासाठी इच्छुक महिला नगरसेविकां सोबत चर्चा केल्यानंतर भाजप प्रभारी सुराणा यांनी सर्वच इच्छुकांनी पक्ष कोअर कमिटी जो निर्णय देईल त्या निर्णयाला बांधील असल्याची भूमिका घेतली असल्याचे माध्यमांना सांगितले या शिवाय भाजपात काही इच्छुकांनी आपल्याला हे पद नको असल्याचे देखील म्हटल्याचे त्यांनी नमूद केलं.
बुडा अध्यक्ष आणि भाजप महानगर अध्यक्ष मराठा समाजाचे आहेत त्यामुळे महापौर पद लिंगायत समाजाला द्यावी अशी कोणतीही मागणी नसून उद्या भाजपचा महापौर उपमहापौर होईल असेही त्यांनी म्हटले आहे.