बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून निवडणूक आयोगानेही तयारीला सुरुवात केली असून निवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बेळगावमधील मतदार केंद्रांवरील ईव्हीएम मशीन पाठविल्या आहेत.
बेळगावमध्ये मंगळवारी ६३१७ ईव्हीएम दाखल झाल्या असून हैद्राबादमधून दहा कंटेनरमधून आणलेल्या या मशिन्स हिंडलग्यातील सिल्क फार्मच्या जागेतील निवडणूक आयोगाच्या गोदामात ठेवण्यात आल्या आहेत.
यापूर्वी ईव्हीएम मशिन्स एपीएमसी येथील गोदामात ठेवल्या जात होत्या. मात्र, बेळगाव जिल्ह्याचा मोठा आकार, विधानसभा मतदारसंघांची संख्या लक्षात घेता स्वतंत्र गोदाम बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. हिंडलगा येथे सिल्क फार्मची शासकीय जमीन आहे.
अनेक वर्षे विनावापर असलेल्या त्या जागेत गोदाम बांधण्यात आले असून दोन महिन्यापूर्वी त्याचे काम पूर्ण झाले आहे. आता त्या गोदामाचा वापर सुरू करण्यात आला असून विधानसभा निवडणुकीसाठी आवश्यक ईव्हीएम या ठिकाणी आणून ठेवल्या जात आहेत.
मंगळवारी सकाळी १० कंटेनर याठिकाणी आल्याने परिसरातील रहिवाशांमध्येही कुतूहल निर्माण झाले. पण, त्यात ईव्हीएम असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ मे महिन्यात संपणार आहे. त्यामुळे, मार्चमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांकडून सुरु आहे. याचबरोबर आता प्रशासकीय पातळीवरही तयारी सुरु झाली असून या पार्श्वभूमीवर राज्यभरात अधिकाऱ्यांच्या बदलीचे सत्र सुरु झाले आहे.
बेळगाव जिल्ह्यातील १८ मतदार संघांमध्ये विविध ठिकाणी मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार असून राज्यातील राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत बेळगावला ईव्हीएमची सर्वाधिक गरज आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यक ईव्हीएमचा पुरवठा निवडणूक आयोगाकडून आतापासूनच सुरु झाला आहे.
मागील आठवड्यात पोलीस व केएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ५ जानेवारी रोजी सर्व विधानसभा मतदारसंघाची अंतिम मतदारयादी जाहीर करण्यात आली आहे.मात्र ५ जानेवारीनंतरही मतदारनोंदणी सुरुच आहे. त्या मतदारांचा समावेश पुरवणी मतदारयादीत केला जाणार आहे.