रहदारी नियमाचा भंग केल्याप्रकरणी चलनाच्या स्वरूपात ठोठवण्यात आलेल्या दंडाच्या रकमेत चक्क 50 टक्के सूट देण्याची ऑफर राज्य सरकारने दिली असली तरी बेळगाव शहरात त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. सध्या चलनाच्या स्वरूपात दंड ठोठावण्यात आलेल्या 6.28 लाख प्रकरणांपैकी फक्त 4500 प्रकरणं निकालात निघाली असून गुन्हा व रहदारी विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्या माहितीनुसार 12 लाख रुपयांचा दंड जमा झाला आहे.
बेळगाव शहरातील रहदारी नियमांचे भंग करणाऱ्या वाहनांमध्ये सर्वाधिक नियम भंग दुचाकी वाहनांकडून झाला असून याप्रकरणी एकूण 6.28 लाख गुन्हे नोंद झाले आहेत. गुन्हे करणाऱ्या वाहनांमध्ये बेळगाव आरटीओ कार्यालय, गोकाक, चिक्कोडी, बैलहोंगल आणि शेजारील गोवा व महाराष्ट्र राज्य या ठिकाणच्या नोंदणीकृत वाहनांचा समावेश आहे.
यापैकी बहुतांश वाहनांच्या मालकाचा सदोष पत्ता आणि मोबाईल क्रमांकात झालेला बदल यामुळे 2018 ते 2023 या कालावधीत रहदारी नियम भंगासंदर्भातील दंडाचे ई -चलन अदा करण्यात आले असून संबंधित वाहन मालक -चालकांना दंडाच्या रकमेत 50 टक्क्यांची सूट देण्यात आली आहे.
रहदारी नियम भंगाचा दंड प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. हेल्मेट -4.12 लाख गुन्हे, सिग्नल तोडणे -1.20 लाख गुन्हे, ट्रिपल सीट दुचाकी चालवणे -45245 गुन्हे आणि इतर 51205 गुन्हे. या सर्व गुन्ह्यांसाठी एकूण सुमारे 26 कोटी रुपये इतका रहदारी नियम भंगाचा दंड वसूल होणे बाकी आहे. यासाठीच सरकारने येत्या उद्याच्या 11 फेब्रुवारी पर्यंत दंडाच्या रकमेत 50 टक्के सूट दिली होती. मात्र तरीही बहुसंख्य वाहन चालकांनी दंड भरण्यास पुढाकार घेतलेला नाही.
रहदारी नियम भंग करून दंडास पात्र ठरलेल्या वाहन चालकांना नोटीस बजावण्याबरोबरच ऑनलाइन स्मरणपत्र (रिमाइंडर) धाडण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ज्यांना 5,000 ते 10,000 रुपयांपर्यंत दंड झाला आहे, त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून दंड भरण्याची विनंती करण्यात आली आहे. रहदारी नियम भंगाचा दंड झालेले वाहन मालक -चालक रहदारी दक्षिण कॅम्प पोलीस ठाण्यात अथवा कर्नाटक वन वेबसाईटद्वारे आपला दंड भरू शकतात.