बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तयारीला राजकीय पक्षासह प्रशासकीय यंत्रणाही कामाला लागली असून निवडणुकीसंदर्भात तयारीला वेग येत आहे.
आवश्यक कामांचा निपटारा करण्याच्यादृष्टीने केंद्रीय निवडणूक आयोगाने कामे हाती घेतली असून २२४ विधानसभा मतदार संघांसाठी निवडणूक अधिकारी व सहायक निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचा आदेश बजावण्यात आला आहे.
विविध खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवडणूक अधिकारी तसेच तहसीलदार व इतर आधिकाऱ्यांना सहायक निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्याची सूचना करण्यात आली आहे.
निवडणुकीदरम्यान मतदारांच्या बोटांना शाई लावण्यासाठी १.३ लाख शाईच्या बाटल्या तयार करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने म्हैसूर येथील पुरवठादारांना केली आहे. मतदारयाद्यांची छाननी सुरू असून, अंतिम मतदारयादीच्या आधारावर शाईच्या मागणीनुसार पुरवठा केला जाणार आहे.