पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या तयारी त महापालिकेची सर्व यंत्रणा गुंतली असून त्यांचे शहर स्वच्छतेच्या कामाकडे साफ दुर्लक्ष झाल्यामुळे सध्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कामत गल्लीतील ड्रेनेजचे सांडपाणी भर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ओव्हर फ्लो होऊन वाहत आहे. त्यामुळे अस्वच्छता निर्माण होऊन सर्वत्र दुर्गंधी पसरल्याने नागरिकात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शहरातील कामत गल्लीतील ड्रेनेज पाईपलाईन तुंबून दुर्गंधीयुक्त सांडपाणी सध्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहत आहे. या प्रकारामुळे अस्वच्छता निर्माण होऊन नागरिकांना रस्त्यावरून ये -जा करणे कठीण झाले आहे. सदर प्रकाराची माहिती मिळताच या भागाच्या नगरसेविका ज्योती कडोलकर यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन एका स्वच्छता कर्मचाऱ्या करवी ड्रेनेज मधील सांडपाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालविले असले तरी ते प्रयत्न अपुरे ठरत आहेत.
कामत गल्लीतील सदर ड्रेनेज तुंबून चेंबरमधून सांडपाणी रस्ताभर पसरण्याचा प्रकार वारंवार घडत असतो. या संदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना नगरसेविका कडोलकर यांनी यापूर्वी बऱ्याचदा सदर ड्रेनेजच्या समस्येबद्दल मनपा आयुक्त, आमदार तसेच संबंधित अन्य अधिकाऱ्यांना कल्पना देऊनही अद्यापपर्यंत त्याची दखल घेण्यात आली नसल्याचे सांगितले. प्रभागातील स्वच्छतेच्या कामासाठी फक्त तीन सफाई कामगार देण्यात आले असून स्वच्छतेच्या कामासाठी ते अपुरे पडतात. याबाबतही तक्रार केली आहे परंतु त्याचीही दखल घेण्यात येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एकूणच महापालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कामत गल्लीत सध्या ड्रेनेज तुंबून दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
सातत्याने ड्रेनेज ओव्हरफ्लो होऊन सांडपाणी रस्ताभर पसरण्याच्या या प्रकाराबद्दल गल्लीतील महिलावर्गांनी देखील आज तीव्र संताप व्यक्त केला. सांडपाणी आणि घाणीमुळे घराघरांमध्ये स्वयंपाक खोलीपर्यंत दुर्गंधी पसरत असल्याची तक्रार त्यांनी केली. याखेरीज नळाला येणाऱ्या पिण्याच्या पाण्यातही सांडपाणी मिसळत असल्यामुळे पिण्यासाठी पाणी वापरायचे कसे? असा सवाल त्यांनी केला. याखेरीज महापालिकेचे अधिकारी या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याबद्दल महिलांनी संताप व्यक्त केला.
एकंदर ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर वाहण्याचा प्रकार सातत्याने घडत असल्यामुळे कामत गल्ली येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेंव्हा आमदारांसह महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन कामत गल्ली येथील ड्रेनेजची समस्या तात्काळ निकालात काढावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.