Sunday, January 12, 2025

/

मोकाट कुत्र्याने घेतला 11 जणांचा चावा; मनपा पथक मागावर

 belgaum

शहरातील बापट गल्ली परिसरात एका मोकाट कुत्र्याने तब्बल 11 जणांचा चावा घेतल्याची घटना काल गुरुवारी रात्री घडली असून कुत्र्याच्या हल्ल्यात 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर त्या कुत्र्याला पकडण्यासाठी आज सकाळपासून महापालिकेच्या पथकाने शोध कार्य हाती घेतले आहे.

कुत्र्याने चावा घेतल्याने गंभीर जखमी झालेल्यांची नावे विजय देसाई, सुहास चव्हाण, अमोघ सनदी, श्रीकांत कांबळे आणि अब्दुल रहमान अशी असून त्यांच्यावर बिम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. बापट गल्ली परिसरात वावरणारे संबंधित मोकाट कुत्रे विशेष करून रात्रीच्या वेळी रस्त्यावर ये -जा करणाऱ्यांच्या भुंकत असते आणि बऱ्याचदा अंगावर धावूनही जात असते.

या पद्धतीने दहशत निर्माण करणाऱ्या त्या उपद्रवी कुत्र्याचा बंदोबस्त करावा यासाठी स्थानिक नागरिकांनी प्रशासन आणि महापालिकेकडे वारंवार तक्रार करून देखील अद्यापपर्यंत त्याची दखल घेण्यात आलेली नाही. या दुर्लक्षाचेच पर्यवसान काल रात्रीच्या घटनेत झाले आहे. सदर घटनेने खडबडून जाग्या झालेल्या महापालिका प्रशासनाने आज सकाळपासून त्या कुत्र्याला पकडण्यासाठी शोध कार्य हाती घेतले आहे.

अकरा जणांचा चावा घेऊन त्यांना जखमी करणारे ते काळसर चॉकलेटी रंगाचे नर जातीचे कुत्रे आज सकाळपासून महापालिकेच्या पथकाला गुंगारा देत आहे. त्यामुळे पुढे गल्लीबोळातून धावत जाणारे ते कुत्रे आणि त्याच्यामागे धावणारे महापालिकेचे पथक असे चित्र सकाळी पहावयास मिळाले. दरम्यान अलीकडच्या काळात शहरांमध्ये मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. सदर मोकाट कुत्र्यांचा कळप भर रस्त्यावर, चौकामध्ये अथवा कचराकुंडाच्या आसपास ठाण मांडून बसलेला असतो. यापैकी कांही उपद्रवी कुत्री भुंकत रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर धावून जात असतात. कांही कुत्री रात्रीच्या वेळी विशेष करून दुचाकी वाहन चालकांच्या मागे लागत असल्यामुळे अपघाताच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा कळप असलेल्या भागातून जाताना नागरिकांना जीव मुठीत धरावा लागत आहे. बापट गल्ली परिसराप्रमाणे शहराच्या अन्य भागात तसेच उपनगरांमध्ये देखील नागरिकांना मोकाट कुत्र्यांचा उपद्रव होत आहे. तरी महापालिका प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.