आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे येत्या 15 दिवसात पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाईल, अशी माहिती काँग्रेसचे कर्नाटक प्रदेश निरीक्षक रणदीपसिंग सुरजेवाला यांनी दिली आहे.
शहरातील काँग्रेस भवन मध्ये काल रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील सर्व 224 जागा काँग्रेस लढविणार असून त्यासाठी येत्या 15 दिवसात उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाणार आहे.
त्या अनुषंगाने उमेदवारी अर्जांची पडताळणी झाली आहे. याखेरीज घरोघरी जाऊन काँग्रेसतर्फे गृहज्योति व गृहलक्ष्मी या योजनांबाबतची माहिती देण्यात येईल. पुढील दहा दिवस जागृती कार्यक्रम चालणार आहे. काँग्रेसच्या विविध महत्त्वकांक्षी योजनांसह हमीपत्रामुळे भाजपच्या गोटात चलबिचल सुरू झाली असून त्यांची पराभवाची भीती वाढली आहे. त्यामुळेच मंत्री डॉ. अश्वत नारायण यांनी सिद्धरामय्या यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
भाजपकडून आमदार खरेदी केले जात आहेत. काँग्रेस पारदर्शकपणे निधी गोळा करत असल्याचे सांगून दुसरीकडे राज्यातील भाजपच्या बसवराज बोम्मई सरकारचा उदय 40 टक्के कमिशन गोळा करण्यासाठी झाला आहे, अशी टीकाही सुरजेवाला यांनी केली.
पत्रकार परिषदेस केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकिहोळी, माजी मंत्री वीरकुमार पाटील, ए. बी. पाटील विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, अशोक पट्टण, सलीम अहमद जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी आदी उपस्थित होते.