बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर, तालुका व खानापूर तालुक्यातील कार्यकर्ते आंदोलन सहभागी होणार आहेत. या आंदोलनात अधिकाधिक कार्यकर्ते सहभागी व्हावेत, यासाठी म. ए. समिती प्रयत्नशील असून, येत्या दोन दिवसांत बैठक घेऊन जनजागृती केली जाणार आहे. तसेच मुंबई येथे मुख्यमंत्र्यांसह विविध पक्षांच्या नेत्यांना भेटून आंदोलनाची माहिती दिली आहे, या आंदोलनाला महाराष्ट्रातील नेत्यांनीही पाठिंबा दर्शविला असल्याची माहिती तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते, माजी आमदार मनोहर किणेकर यांनी दिली.
मध्यवर्ती समितीतर्फे २८ फेब्रुवारीला मुंबई येथे आंदोलन केले जाणार असून या आंदोलनाबाबत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी मंत्री जयंत पाटील, छगन भुजबळ आदींची भेट घेऊन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याला सर्वच नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून येत असून ‘चलो मुंबई’ आंदोलनात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते नोंदणी करू लागले आहेत.
बेळगावहून मुंबई येथे आंदोलनासाठी जाणाऱ्या सीमावासियांच्या राहण्याची सोय उत्तमप्रकारे करण्यात आली असून आंदोलन काळात आंदोलनकर्त्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही, यासंदर्भात महाराष्ट्राने सहकार्याची भूमिका ठेवून आश्वासन दिले आहे, शिवाय खाजगी वाहनातून आंदोलनात सहभागी होणाऱ्या आंदोलनकर्त्यांच्या वाहनाला टोलमाफीचे आश्वासन देखील देण्यात आले आहे, अशी माहिती समिती नेत्यांनी बेळगाव live शी बोलताना दिली.
आंदोलनाबाबत जनजागृती करण्यासाठी लवकरच विभागावर बैठकांचे आयोजन केले जाणार असून बेळगाव तालुका, शहर आणि खानापुर तालुक्यातून कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे आणि स्वेच्छेने नोंदणी करत आहेत. म. ए. समितीतर्फे आंदोलनाबाबत जनजागृती करण्यासाठी बैठकांचे आयोजन केले जाणार असून प्रत्येक भागातून कार्यकर्ते सहभागी व्हावेत, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
अनेकांनी समितीच्या आव्हानाला प्रतिसाद देत अगोदरच रेल्वे आणि बसचे बुकिंग केले आहे. सीमाभागातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते रवाना होणार असल्यामुळे आंदोलनासाठी जाणाऱ्या वाहनांना टोल माफी होण्याचीही शक्यता आहे.