Monday, January 27, 2025

/

महापौर-उपमहापौरपद मराठी भाषिकांना देण्यामागची रणनीती काय?

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक जरी राष्ट्रीय पक्षांच्या चिन्हावर झाली असली आणि सर्वाधिक जागांवर भाजपने सत्ता मिळवली असली तरीही सीमाभागात मराठी भाषिकांचे प्राबल्य अधिक असल्याचे भाजपने मान्य केले आहे हे आजच्या महापौर-उपमहापौर निवडणुकीवरून स्पष्ट झाले आहे. भाजपने आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दोन्ही पदावर मराठी भाषिक उमेदवारांना संधी दिली आहे.

सध्या बेळगाव शहरातील दोन्ही विधानसभा मतदारसंघात भाजपचेच आमदार आहेत. यामुळे दोन्ही विधानसभा मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून भाजपाने महापौर-उपमहापौर पदाची घोषणा केली आहे. दोन्ही मतदारसंघात, महानगरपालिका कार्यक्षेत्रात मराठी भाषिकांचे प्राबल्य भाजपने मान्य केले आहे.  सध्या भाजपवर मराठी भाषिक मोठ्या प्रमाणात नाराज आहेत त्यामुळे आगामी विधानसभा मतदारसंघात आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी भाजपने मराठी भाषिकांनाच उमेदवारी देत मराठा समाजाला गोंजारण्याचे राजकारण साधले आहे, अशी चर्चाही बेळगाव मध्ये सुरू आहे.

बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक पक्षाच्या चिन्हावर झाली असली आणि सर्वाधिक जागा भाजपने मिळवल्या असल्या तरीही भाजपला कन्नड भाषिकांना उमेदवारी देण्याचे साहस झाले नाही. पहिल्यांदाच भाजपने दोन्ही पदे मराठा समाज आणि मराठी भाषेच्या उमेदवाराला दिली आहेत. महापौरपदी शोभा सोमानाचे आणि उपमहापौरपदी रेश्मा पाटील यांची निवड भाजपने केली आहे. वास्तविक पाहता कन्नड भाषिक इच्छुकांचीही संख्या अधिक होती. कन्नड रक्षण वेदिकेसह अनेक मंत्र्यांचाही कन्नड भाषिक महापौर करण्यासाठी दबाव होता. मात्र, तरीही बेळगावच्या स्थानिक भाजपने पुन्हा एकदा मराठा समाजाला उमेदवारी देऊन मराठी मतदारांना या माध्यमातून आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

 belgaum

दुसरीकडे महापौर पदासाठी वडगाव आणि अनगोळ या भागातील दोन महिला इच्छुक होत्या. मात्र, आवर्जून भाजपने अनगोळ मधील महिलेलाच संधी दिली. अनगोळमध्ये श्रीराम सेना हिंदुस्थानचा वाढता प्रभाव आणि भाजपचा प्रभाव कमी होत चालला आहे असे वाटत आहे. यामुळे जाणीवपूर्वक भाजपने हा निर्णय घेतल्याचेही बोलले जात आहे. एकूणच आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठी भाषिकांना गोंजारण्यासाठी ही दोन्ही पदे देण्यात आलेली आहे, हे प्रकर्षाने जाणवत आहे असेही विश्लेषण होत आहे.Mayor deputy mayor

आत्तापर्यंत बेळगाव महानगरपालिकेवर मराठी भाषिकांचे वर्चस्व राहिलेले आहे. मनपा सभागृह स्थापन झाल्यापासून बेळगाव महापालिकेमध्ये 1984 मध्ये सुभाष जाधव हे पहिले महापौर झाले होते. केवळ सिध्दनगौडा पाटील, प्रशांता बुडवी, यल्लाप्पा कुरबर, बसाप्पा चिकलदिनी आणि एन. बी. निर्वाणी हे पाच महापौर वगळता गेल्या ३० वर्षांच्या मनपा कार्यकाळातील जवळपास २४हून अधिक महापौर हे सर्व मराठी भाषिकच राहिले आहेत.

आज झालेल्या महापौर-उपमहापौर निवडणुकीसाठी कन्नड भाषिक नगरसेविका वाणी जोशी आणि दिपाली टोपगी या दोन नगरसेविकांना उमेदवारी देण्यासंदर्भात दबाव वाढला होता. विशेषतः वाणी जोशी यांना महापौर पद मिळावे यासाठी मोठ्या प्रमाणात लॉबिंग झाली होती. कन्नड संघटनांचा देखील दबाव वाढला होता. कन्नड भाषिकांचा महापौर असावा यासाठी कन्नड भाषिक नगरसेवकांना उमेदवारी देण्याची मागणी देखील भाजपाकडे करण्यात आली होती.Mayor dy mayor

याव्यतिरिक्त मंत्र्यांचे देखील फोनसत्र सुरू होते. मात्र, तरी देखील मराठी भाषिकांच्या गळ्यात महापौर-उपमहापौर पदाची माळ पडली असून आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच भाजपने हा कित्ता गिरवला असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

भाजपने मराठी भाषिक नगरसेवकांना डावलून महापौर-उपमहापौर पदाची उमेदवारी दिली असती तर भाजपमधील मराठी भाषिक नगरसेवकांचा अंतर्गत विरोध उफाळून आला असता आणि त्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीत याचा फटका बसला असता. म्हणूनच भाजपने हा निर्णय घेतल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.