सालाबादप्रमाणे पुणे स्थित शिवाजी ट्रेल संघटने मार्फत स्वराज्यातील सरदार घराण्यांच्या वंशजांच्या हस्ते आज 26 फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी देशभरातील सुस्थितीतील शिवकालिन गड-किल्ल्यांची पूजा करण्यात आली.
शेकडो वर्षाच्या इतिहासाचा साक्षीदार असणाऱ्या बेळगावच्या भुईकोट किल्ल्याचे विधिवत पूजन दादाराजे निपाणीकर सरकार यांच्या हस्ते रविवारी सकाळी करण्यात आले . देशातील गडकिल्ल्यांचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे या उद्देशाने देशातील १२३ किल्ल्यांचे पूजन शिवाजी ट्रेल या संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहे . या १२३ किल्ल्यामध्ये बेळगावच्या भुईकोट किल्ल्याचा समावेश असून त्याच्या पूजनाचा मान निपाणीकर सरकारांच्याकडे आहे .
रविवारी सकाळी भुईकोट किल्ला येथे निपाणीकर सरकार ,त्यांचे भालदार ,चोपदार आणि कार्यकर्त्यांसह आगमन झाले .किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी विधिवत दुर्गापूजन दादाराजे निपाणीकर यांनी केले . दुर्गापूजनाचे पौरोहित्य लष्कराच्या दुर्गादेवी मंदिराच्या पंडितांनी केले .
बेळगाव भुईकोट किल्ल्याच्या ठिकाणी आज सकाळी सर्वप्रथम निपाणी सरकारांसह स्वराज्यातील सरदार घराण्यांच्या वंशजांनी पारंपरिक रीतीरिवाज पाळत किल्ल्यातील श्री दुर्गा देवी मंदिरात जाऊन देवीचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर निपाणी सरकार यांच्या हस्ते किल्ल्याचे विधिवत पूजन करून श्रीफळ वाढविण्यात आले. याप्रसंगी जय भवानी जय शिवाजी, छ. शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव असा जयजयकार करण्यात येत होता. याप्रसंगी शिवाजी ट्रेलचे संयोजक आणि सद्भावना दूत श्रीमंत रमेशराव केशवराव रायजादे, हारोलीकर सरकार आणि दिलीपराव केशवराव रायजादे, हारोलीकर सरकार, श्रीमंत सौ. सुचिता रमेशराव रायजादे, साहित्यिक गुणवंत पाटील, विजय बोंगाळे सुनील जाधव आदींसह बहुसंख्य शिवप्रेमी उपस्थित होते.
या कार्यक्रमामार्फत भावी पिढीला शिवकालीन गड किल्ल्यांचे महत्व पटवून देणे आणि किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन व्हावे या उद्देशाने किल्ल्यांचे पूजन केले जाते. कर्नाटक सरकार व केंद्र सरकारने या किल्ल्यांचे संवर्धन करावे जेणे करून हे किल्ले भावी पिढीला पहायला मिळतील. हे किल्ले म्हणजे जुन्या काळातील शुरवीरांनी आपलं रक्त सांडून केलेल्या पराक्रमाचे हे किर्तीस्तंभ आहेत. त्याचे जतन होणे ही काळाची गरज आहे, अशी प्रतिक्रिया निपाणीचे सरकार दादा राजे यांनी यावेळी व्यक्त केले.
रमेश रायजादे हारोलीकर सरकार यांनी शिवाजी ट्रेलतर्फे आज एकाच दिवशी जवळपास एकाच वेळेला देशातील विविध ठिकाणच्या शिवकालीन गडकिल्ल्यांचे पूजन केले जात असल्याचे सांगितले. भावी पिढीला आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची माहिती व्हावी आणि त्यांनी तो वारसा जपावा. त्याचप्रमाणे सरकारने शिवकालीन गडकिल्ले ढासळून नामशेष होणार नाहीत याची काळजी घ्यावी. त्यांचे संवर्धन केले जावे. यासाठी गडकोट किल्ल्यांचे पूजन करण्याचा हा उपक्रम राबविला जात असल्याचे रायजादे सरकार यांनी स्पष्ट केले.