बेळगाव स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या व्यवस्थापनास जबाबदार असलेल्या कर्नाटक शहर विकास खात्याने दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत स्मार्ट सिटी योजनेचे 81 टक्के काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे.
बेळगाव स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत 1140 कोटी रुपये खर्चाच्या 108 विकास कामांपैकी आतापर्यंत 609.2 कोटी रुपये खर्चाची 88 विकास कामे पूर्ण करण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त 530.9 कोटी रुपये खर्चाची उर्वरित 20 विकास कामे अद्यापही सुरू आहेत.
यापूर्वीच आम्ही प्रसिद्धीस दिल्याप्रमाणे कोरोना प्रादुर्भाव काळातील विलंब लक्षात घेऊन एनआयटीआय आयोगाच्या शिफारसी वरून देशातील संबंधित सर्व 100 शहरांमधील स्मार्ट सिटी मिशन (एससीएम) अंतर्गत विकास कामे पूर्ण करण्यासाठीची अंतिम मुदत वाढवून ती जून 2023 करण्यात आली आहे.
त्यासाठी बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेड प्रलंबित असलेली कामे तात्काळ हाती घेण्याबरोबरच जी कामे सध्या सुरू आहे ती लवकर पूर्ण करण्याच्या तयारीला लागले आहे.
ही सर्व तयारी सुरू असली तरी स्मार्ट सीटी योजनेअंतर्गत शहरातील अनेक विकास कामे अर्धवट अवस्थेत आहेत. उदाहरणार्थ मंडोळी रोड हा शहरातील पहिला स्मार्ट रस्ता जो कागदोपत्री पूर्ण झालेला असला तरी प्रत्यक्षात त्याचे विकासकाम अर्धवट अवस्थेतच आहे. हीच अवस्था कलामंदिर येथील बहुउद्देशीय व्यापारी संकुल आणि व्हॅक्सिन डेपो येथील विविध विकास कामांच्या बाबतीत आहे.
यापैकी व्हॅक्सिन डेपो येथील विकास कामे जूनपर्यंत पूर्ण होतीलही मात्र कलामंदिर येथील व्यापारी संकुलाचे काम पूर्ण होण्यास विलंब लागणार आहे. स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत दिलेली मुदत समताच 30 जून 2023 पर्यंत स्मार्ट सिटी लिमिटेडच्या अखत्यारीतील सर्व विकासकामे बेळगाव महापालिकेसह पोलीस वगैरे संबंधित अन्य सरकारी खात्यांकडे हस्तांतरित केली जाणार आहेत.