देशाचे स्वातंत्र्य आणि उत्कर्षात बेळगावची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. देशात सध्या स्टार्टअपची खूप चर्चा होते. मात्र बेळगावमध्ये 100 वर्षांपूर्वी बाबुराव पुसाळकर यांनी आपल्या छोट्या युनिटच्या माध्यमातून स्टार्टरची सुरुवात केली होती, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.
शहरातील मालिनी सिटी येथे आज सोमवारी दुपारी आयोजित आपली जाहीर सभा आणि विविध योजना, प्रकल्पांच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. भारत माता की जय ही घोषणा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या हिंदी भाषणाची सुरुवात कन्नडमध्ये केली. बेळगावच्या जनतेचे प्रेम व आशीर्वाद अतुलनीय असून या प्रेम व आशीर्वादाने आम्हा सर्वांना दिवस-रात्र जनसेवा करण्याची प्रेरणा मिळते. बेळगावची धरती एखाद्या तीर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही. या ठिकाणी वीर राणी कित्तूर चन्नम्मा, क्रांतीवीर संगोळी रायण्णा सारख्या पराक्रमी व्यक्ती निर्माण झाल्या. देशाच्या स्वातंत्र्य आणि उत्कर्षात बेळगावची महत्त्वपूर्ण भूमिका आहे असे सांगून देशात सध्या स्टार्टरची खूप चर्चा होत असली तरी 100 वर्षांपूर्वी बेळगावमध्ये या स्टार्टअपची सुरुवात झाली होती आणि ती सुरुवात बाबुराव पुसाळकर या उद्योजकांनी आपल्या एका लहान युनिटच्या माध्यमातून केली होती. तेंव्हापासून बेळगाव हे अनेक उद्योगधंद्यांचे केंद्र बनले आहे. येत्या काळात हे केंद्र अधिक सशक्त करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. नव्या विकास योजना आणि प्रकल्पांना चालना देण्यात येत असल्यामुळे बेळगावच्या विकासाला देखील गती येणार आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
आज बेळगावच्या माध्यमातून कर्नाटक देशाशी जोडला गेला आहे. प्रधान मंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत आज देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकूण 16000 कोटी रुपयांचे अनुदान एकही पैसा इकडे तिकडे न होता थेट जमा झाले आहे. हेच जर काँग्रेस सरकारच्या काळात घडले असते तर 16 हजार कोटीतील 12 ते 13 हजार कोटी गायब झाले असते. परंतु मोदी सरकारने एकेक पैसा शेतकऱ्यांना मिळेल अशी व्यवस्था केली आहे. हे अनुदान म्हणजे सर्व शेतकऱ्यांना होळी सणाची शुभेच्छा आहे. आज आपल्या देशात 80 ते 85 टक्के लहान शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांच्या विकासाला आम्ही प्राधान्य दिले असून आजपर्यंत त्यांना 2.5 लाख कोटी रुपयांचे अनुदान वितरित केले आहे. जे त्यांच्या बँक खात्यावर थेट जमा झाले आहे. विशेष म्हणजे या निधी पैकी 25 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी शेतकरी माता-भगिनींच्या खात्यावर जमा झाला आहे. यामुळे लहान सहान गरजा पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना आता दुसऱ्याकडे हात पसरावे लागणार नाही. सावकाराकडून अव्वाच्या सव्वा व्याज दराने कर्ज काढावे लागणार नाही, असे पंतप्रधान पुढे म्हणाले.
भारतीय जनता पक्षाचे सरकार 2014 साली केंद्रात सत्तेवर आल्यापासून देशाच्या कृषी क्षेत्राला आधुनिकतेची जोड देत अथक बदल घडविले जात आहेत. देशाचा कृषी अर्थसंकल्प 2014 मध्ये 25,000 कोटी रुपयांचा होता जो यंदाच्या वर्षी 1 लाख 25,000 कोटींपेक्षा जास्त आहे. यावरून भाजप सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी किती गंभीर आणि क्रियाशील आहे हे स्पष्ट होते. केंद्राच्या कृषी अर्थसंकल्प हा आजच्या कृषी गरजांची पूर्तता करण्याबरोबरच भविष्याची तरतूद करणारा आहे असे सांगून रासायनिक खत, कीटकनाशक, कडधान्य, ऊस उत्पादन यासंदर्भात आपल्या सरकारने उचललेल्या पावलांची माहिती पंतप्रधानांनी दिली.
आम्ही जेंव्हा सत्तेवर आलो, तेंव्हा 2014 मध्ये रेल्वेचा अर्थसंकल्प 4000 कोटी रुपयांचा होता. जो यावर्षी 7.5 हजार कोटी रुपयांचा आहे. कर्नाटकमध्ये तर सध्या रेल्वेच्या 45 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची काम सुरू आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. बेळगावमध्ये हायटेक रेल्वे स्थानक उभारण्याद्वारे आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कर्नाटकातील अनेक रेल्वे स्थानकांचे असे आधुनिकीकरण केले जात आहे. लोंढा -बेळगाव -घटप्रभा रेल्वे मार्ग दुपदरीकरणामुळे येथील रेल्वे सेवा अधिक वेगवान होईल. याचा बेळगावातील शिक्षण, आरोग्य आणि पर्यटन क्षेत्राला चांगला फायदा होईल. देशाचा सर्वांगीण विकास कनेक्टिव्हिटीमुळेच शक्य आहे. यासाठीच आमचे सरकार सर्वाधिक प्राधान्य कनेक्टिव्हिटीला देत आहे असे स्पष्ट करून पिण्याच्या पाणी पुरवठ्यातील प्रगती, बांबूची शेती आणि व्यापारावरील उठवलेले निर्बंध, बेळगावसह देशातील कारागीर व हस्तकलाकारांच्या विकासासाठी अंमलात आणलेली प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना याबद्दल त्यांनी माहिती दिली. तसेच भाजपचे डबल इंजिन म्हणजे जलद विकासाची गॅरंटी असल्याचे सांगितले.
कर्नाटकातील ज्येष्ठ नेते काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे उदाहरण देताना पंतप्रधानांनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर जोरदार टीका केली. खर्गे हे नावालाच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष असून पक्षाचा रिमोट मात्र दुसऱ्याच्या हातात आहे. तेंव्हा कर्नाटकातील जनतेने काँग्रेसच्या घराणेशाहीपासून सावध राहावे. काँग्रेसचे नेते हताश झाले आहेत असे सांगून मोदीला केंव्हा एकदा गाडतो, असे काँग्रेस नेत्यांना झाले असले तरी जनता मात्र ‘मोदी तेरा कमल खिलेगा’ असे म्हणत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी मुश्किलपणे सांगितले.
बेळगावातील अबाल वृद्धांनी केलेल्या माझ्या स्वागताची दृश्य अभूतपूर्व होते. त्यासाठी नतमस्तक होऊन मी सर्वांना प्रणाम करतो. बेळगावसह कर्नाटकातील जनतेला मी विश्वास देतो की तुम्ही जे प्रेम आशीर्वाद देत आहात त्याची मी व्याजासह परतफेड करेन. भविष्यात बेळगावसह कर्नाटकाचा निश्चितपणे अधिकाधिक विकास करेन, असे ठोस आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी दिले.
आजच्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रिमोटद्वारे किसान सन्मान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना तेराव्या टप्प्याचे 16 हजार कोटी रुपयांचे अनुदान वितरण करण्याबरोबरच नूतनीकरण करण्यात आलेल्या बेळगाव हायटेक रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्यात आले. त्याचप्रमाणे महत्त्वकांक्षी जनजीवन मिशन अंतर्गत 1120 कोटी रुपये खर्चाच्या पाच बहुग्राम योजना, 30 कोटी रुपये खर्चाच्या हलभावीसह इतर गावातील पाणी योजना, 410 कोटी रुपयांची सौंदत्तीसह अन्य गावांसाठी पाणी योजना, 565 कोटी रुपयांची कित्तूर -खानापूर तालुका पाणी योजना आणि अथणी -चिक्कोडी तालुक्यातील 43 कोटी रुपयांची पाणी योजना, रेल्वे विभागाची 1122 कोटी रुपयांची विविध विकासकामे आणि लोंढा -बेळगाव -घटप्रभा रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
जाहीर सभेची सुरुवात स्वरांजली संगीत संस्थेच्या कलाकारांनी सादर केलेल्या नाड गीताने झाली. त्यानंतर कर्नाटक संस्कृती व परंपरेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पंतप्रधानांना खास शाल घातली. खासदार अण्णासाहेब जोल्ले व खासदार इराणा कडाडी यांनी पंतप्रधानांना मोठा चंदनाचा हार घातला. त्याचप्रमाणे पाटबंधारे व बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी पंतप्रधानांना म्हैसुरी पगडी घातली. धर्मादाय हज खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले आणि बेळगावच्या खासदार मंगल अंगडी यांनी श्री रेणुका अर्थात श्री यल्लमा देवीची प्रतिमा, तर बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके आणि दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी पंतप्रधानांना त्यांचेच तैलचित्र भेटी दाखल दिले. पंतप्रधानांच्या सत्कारानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमरजी यांनी केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी योजनांची थोडक्यात माहिती दिली. यावेळी आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्षानिमित्त पंतप्रधानांच्या हस्ते एका मातीच्या भांड्यात कडधान्य बिजारोपण करण्यात आले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी याप्रसंगी समयोचीत विचार व्यक्त केले. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत पार पडलेल्या आजच्या जाहीर सभेस शहरासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह लाखो नागरिक उपस्थित होते.