बेळगाव महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक येत्या सोमवारी दि. 6 फेब्रुवारी रोजी होणार आहे. महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचे बहुमत असून पक्षाच्यावतीने महापौर उपमहापौर पदाकरिता उमेदवारांचे नांव निश्चित करण्यासाठी उद्या रविवारी सायंकाळी बैठक होणार आहे.
बेळगावचे महापौर आणि उपमहापौर कोण असणार हे उद्या रविवारी बेळगावमध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये निश्चित होण्याची शक्यता आहे. बेळगाव जिल्हा भाजप प्रभारी निर्मलकुमार सुराणा, शहराचे आमदार आणि भाजपचे सर्व नगरसेवक उद्या होणाऱ्या बैठकीत सहभागी असणार आहेत.
सदर बैठकीमध्ये निर्मलकुमार सुराणा उपस्थित सर्वांची मतं जाणून घेतल्यानंतर महापौर व उपमहापौर पदासाठीच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करून ते जाहीर करणार असल्याचे समजते. बेळगाव महापौर पद सामान्य महिला तर उपमहापौर पद मागास ‘ब’ वर्ग महिला असे आरक्षित आहे.
महापौर पदासाठी नगरसेविका भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्या सारिका पाटील, वाणी जोशी, शोभा सोमनाचे आणि दिपाली टोपगी यांची नावे त्याचप्रमाणे उपमहापौर पदासाठी वैशाली भातकांडे आणि रेश्मा पाटील यांची नावे चर्चेत आहेत. बेळगाव उद्या होणाऱ्या भाजपच्या हाय -पाॅवर बैठकीमध्ये महापौर व उपमहापौर पदासाठी नावे निश्चित झाल्यास सोमवारची निवडणूक बिनविरोध होणार आहे.
महापौर पदासाठी वाणी विलास जोशी यांनी जोरदार फिल्डींग लावली असून सध्याचे चित्र पाहता वाणी जोशी यांचे पारडे जड मानले जात आहे जरी वडगावच्या नगरसेविका सारिका पाटील यांच्या कडे फोकस असला तरी जोशी यांनी राज्यातील हाय कमांड कडून चालवलेल्या लॉबिंग मुळे त्यांनाच हे पद मिळू शकते असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.