बेळगाव लाईव्ह : सध्या संपूर्ण राज्यभरात निवडणुकीचे वातावरण आहे. एकमेकांवर टीका-टिप्पण्या करत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आतापासूनच जोरदार रस्सीखेच सुरू असून याचदरम्यान बेळगाव मधील विविध भागात ‘कमळ मोहीम’ डोके वर काढू लागली आहे.
डबल इंजिन सरकार असणाऱ्या भारतीय जनता पक्षाला कोणत्या गोष्टीची भीती वाटत आहे ?ज्यामुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध कल्पना लढवल्या जात आहेत? निवडणुका तोंडावर आल्या असून भाजपा लोकप्रतिनिधी विकासकामे पूर्ण करण्याकडे गुंतले आहेत तर दुसरीकडे गल्लीबोळातील भिंतीवर कमळ रंगवण्याची जणू स्पर्धा सुरू आहे.
पूर्वीच्या काळात प्रचंड प्रमाणात असणारी मतदारांची संख्या लक्षात घेत निवडणुकीतील उमेदवाराचे चिन्ह प्रत्येकाच्या मनावर रुजवण्यासाठी भिंतीभिंतीवर उमेदवाराच्या नावासहित चिन्ह रंगवलं जायचं. त्यावेळी आजच्यासारख्या सोशल मीडिया सारख्या गोष्टीही उपलब्ध नव्हत्या. मात्र, मध्यंतरी ठिकठिकाणी रंगविण्यात येणाऱ्या भिंती संदर्भात विशिष्ट प्रकारचे अभियान राबवून जनजागृती करण्यात आली. गाव,गल्ली, बोळ, परिसर स्वच्छ रहावा या उद्देशाने भिंतीवर कोणत्याही प्रकारची रंगरंगोटी करण्याला फाटा देण्यात आला. अनेक ठिकाणी समाजाभिमुख संदेश देणारे मजकूर रंगविण्यात आले, तर काही ठिकाणी चित्रांच्या माध्यमातून जनजागृती करणारे मजकूर देखील भिंतीवर रंगवण्यात आले. एका अर्थाने ही भूमिका स्वागतार्ह होती. मात्र, आता याच भूमिकेला भारतीय जनता पक्षाकडून हरताळ फासला जात आहे.
सध्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय पक्ष युद्ध पातळीवर कामाला लागले आहेत. याचाच एक भाग म्हणून बेळगाव मधील विविध ठिकाणी प्रामुख्याने दक्षिण विधानसभा मतदार संघात कमळाचे चिन्ह गल्लोगल्ली भिंतीवर रंगविले जात असल्याचे निदर्शनात आले आहे. हळूहळू बेळगाव शहराची स्मार्ट सिटी म्हणून गणना केली जाणार आहे. मात्र, या स्मार्ट सिटीचे विद्रूपीकरण करणे हे कोणत्या नितीनियमात बसते? ही बाब सत्ताधारी पक्षाने विचारात घेणे गरजेचे आहे.
एकंदर ही सर्व परिस्थिती पाहता आणि या सगळ्या भूमिकेतून विचार करता सत्ताधारी भाजपची दुटप्पी भूमिका सर्वांसमोर येत चालली आहे. बेळगाव मध्ये हाती घेण्यात आलेल्या रंगरंगोटीच्या उपक्रमाला भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीने विरोध करावा आणि बेळगाव शहराचे होणारे विद्रूपीकरण थांबवावे, अशी मागणी जनमानसातून पुढे येत आहे.