बेळगाव महानगरपालिकेच्या नगरसेवक पदाची निवडणूक आटोपल्यानंतर बऱ्याच विलंबाने अखेर महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होत आहे. बेळगाव शहराला महापौर आणि उपमहापौर मिळण्यासाठीची प्रतीक्षा संपणार या प्रकारच्या बातम्या सगळ्या सध्या पसरू लागल्या आहेत. मात्र ही प्रतिक्षा संपली तरी मक्तेदारी केव्हा संपणार? हा प्रश्न सध्या अनुत्तरित राहीला आहे.
कधी नव्हे ते राष्ट्रीय पक्षांच्या चिन्हावर झालेल्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली. आपापल्या वार्डात नव्हे तर गल्लीत ही ओळखले न जाणारे अनेक जण नगरसेवक पदावर आरूढ झाले. आता याच व्यक्तींना आपला महापौर आणि उपमहापौर निवडण्याची संधी आहे. मात्र या व्यक्ती ठरवतील तो महापौर आणि उपमहापौर होणार की ज्यांची मक्तेदारी ती ते लोक त्यांना हात वर करायला सांगणार? हे सभागृहातच ठरणार आहे आणि समाजाला कळणार देखील आहे.
सध्या तरी मक्तेदारी असणाऱ्या मंडळींनीच महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवार ठरवले असून निवडून आलेल्या त्या नगरसेवकांना फक्त हात वर करण्याचे तेवढेच काम असणार आहे. असे चित्र आहे त्यामुळे महापौर आणि उपमहापौर जरी शहराला मिळाले तरी मक्तेदारी संपण्याची प्रतीक्षा अद्याप संपलेली नाही. हे संपूर्ण शहराला, संबंधित हात वर करणाऱ्या नगरसेवकांना आणि पुढे पदावर महापौर आणि उपमहापौर म्हणून बसणाऱ्या संबंधितांना लवकरच कळणार आहे.
सध्याच्या परिस्थितीत भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले असले तरी अनेक नगरसेवक या परिस्थितीबद्दल बोलू लागले आहेत. आम्ही फक्त हात वर करण्यापुरते असे त्यांचे मत आहे. गेले कित्येक दिवस साधा हात वर करण्याची संधी सुद्धा मिळाली नव्हती आता ही संधी मिळणार एवढ्या पुरतेच समाधान मानून जगण्याची वेळ त्यांच्यावर येणार की बेळगाव शहराचा कारभार त्यांच्या हाती येणार? हा प्रश्न अद्यापही अनुतरित आहे.
नगरसेवकांचे अधिकार, त्यांनी निवडलेला महापौर, त्यांनी निवडलेला उपमहापौर याच बरोबरीने स्थानिक स्थायी समितीचे अध्यक्ष आणि इतर सारे राजकारण या साऱ्या चौकटीत विधानसभेचा हस्तक्षेप जितका कमी होईल… तितके शहराचे राजकारण चांगले चालते. असा यापूर्वीचा अनुभव आहे. यापूर्वीच्या अनेक आमदारांनी जरी हस्तक्षेप केला तरी नगरसेवक या लोकप्रतिनिधींना योग्य तो मान आणि सन्मान मिळवून देण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले होते. मात्र सध्या तरी मक्तेदारीच्या राजकारणात महानगरपालिकेचा बळी घेतला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
नजीकच्या महाराष्ट्राच्या राजकारणात मुंबई महानगरपालिकेवर सत्ता कोणाची? या परिस्थितीवर राज्यभरातील अनेक महानगरपालिकांचे भवितव्य रखडले आहे. अशाच परिस्थितीत सध्या बेळगाव उत्तर आणि दक्षिण या मतदारसंघाच्या भवितव्यासाठी बेळगाव महानगरपालिकेचे भवितव्य रखडले ,अडखळले आणि फक्त हात वर करण्या.पुरता उरले की काय? अशी शंका निर्माण होत असून ही परिस्थिती बदलण्यासाठी मक्तेदारी संपण्याची गरज निर्माण झाली आहे.
महापौर आणि उपमहापौर निवडणूक होईल. महापौर आणि उपमहापौर निवडले जातील. मात्र ते फक्त दिशादर्शक नकाशा सारखे न होता, त्यांना योग्य ते निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी. या दृष्टीने मक्तेदारी संपवावी लागणार असून ज्या पक्षाच्या चिन्हाच्या निवडणुकीवर यंदाची निवडणूक गाजली व ऐतिहासिक ठरली त्या पक्षांनीच आता या प्रकरणी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.