बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये १८ व १९ फेब्रुवारी २०२३ रोजी ‘बालरंगभूमी अभियान, मुंबई’ आयोजित पहिले बालनाट्य संमेलन रंगणार आहे. ‘बालरंगभूमी अभियान, मुंबई’ ने एक डौलदार पाऊल पुढे टाकत बेळगावमध्ये या साहित्य संमेलनाचे आयोजन केले असून सदर संमेलन बेळगाव येथील ‘संत मीरा हायस्कूल’मध्ये आयोजिण्यात आले आहे.
हे संमेलन सुमारे तीनशे मुलांसाठी पूर्णपणे मोफत असणार आहे. बेळगावच्या प्रसिद्ध अभिनेत्री सई लोकूर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. सई लोकूर यांनी आपल्या करिअरची सुरुवात बेळगावमधील नाटकातून केली आहे. समारोपाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांच्यासह बेळगावचे प्रसिद्ध अभिनेते प्रसाद पंडित व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
संमेलनास उपस्थित राहणाऱ्या बालचमूंची भोजनाची व्यवस्था संमेलन स्थळी करण्यात आली आहे. संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झालेल्या मीना नाईक या संमेलनाध्यक्षा असून दोन्ही दिवस त्या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत.
संमेलनाचे उद्घाटन शनिवार दि. १८ फेब्रुवारी रोजी दुपारी नाट्यदिंडीने करण्यात येईल. उद्घाटन समारंभानंतर बेळगावच्या कलाकारांचा सहभाग असलेली दोन बालनाट्यं शिबिरार्थींसाठी सादर करण्यात येतील. रविवार १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते १ या वेळेत बालरंगभूमी अभियानसाठी काम करणारे, मुंबई – पुण्यातील तज्ज्ञ मंडळी तीनशे मुलांसाठी अभिनयाची कार्यशाळा घेतील. यासह प्रत्येक शाळेतून येणाऱ्या शिक्षक आणि पालकांसाठी चर्चासत्राचे आयोजन देखील करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारच्या सत्रासाठी महाराष्ट्रातून राज्य नाट्य स्पर्धेला बक्षीस मिळवलेल्या तीन नाटकांचे प्रयोग सादर करण्यात येणार आहेत. रविवारी संध्याकाळी संमेलनाची सांगता होणार आहे.
बेळगावच्या मुलांमध्ये अभिनयाची आवड निर्माण व्हावी, आत्मविश्वास वाढावा, त्यांच्यामध्ये सभाधिटपणा यावा या उद्देशाने ‘बालरंगभूमी अभियान, मुंबई’ या संस्थेतर्फे ‘पहिल्या बालनाट्य संमेलनाचे’ आयोजन करण्यात आले आहे. ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा बेळगाव’ आणि ‘फुलोरा बेळगाव’ या संस्थांचे सहकार्य संमेलनाला लाभले आहे. या संमेलनाला अनेक दिग्गज उपस्थित राहणार असल्याचे बालरंगभूमी अभियान, मुंबईच्या अध्यक्षा वीणा लोकूर यांनी सांगितले.