बेळगाव लाईव्ह : गेल्या 66 वर्षांपासून महाराष्ट्रात जाण्याची तळमळ ठेवून कर्नाटकात खितपत पडलेल्या सीमा भागातील जनतेची तळमळ महाराष्ट्र सरकार पर्यंत पोहोचावी आणि अंतिम टप्प्यात असलेल्या सीमा प्रश्न महाराष्ट्राचे लक्ष वेधण्यासाठी सीमाभागातील मराठी भाषिकांनी मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन छेडले आहे
. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली आज मुंबई येथील आझाद मैदानावर बहुसंख्य मराठी भाषिकांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन सुरू आहे.
धरणे आंदोलनाच्या व्यासपीठावर महाराष्ट्रातील आमदार भरत गोगावले, आमदार भास्कर जाधव यांच्यासह मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, चिटणीस मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, तालुका म. ए. समिती अध्यक्ष मनोहर किणेकर, चिटणीस एम. जी. पाटील, खानापूर तालुका म. ए. समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई, आणि खानापूर तालुका म. ए. समिती चिटणीस, तसेच माजी आमदार दिगंबर पाटील, बिदर म. ए.समिती अध्यक्ष रामराव राठोड, चिटणीस पृथ्वीराज पाटील, निपाणी म. ए. समिती अध्यक्ष जयराम मिरजकर आदींची उपस्थिती होती
यावेळी बोलताना माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले, सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्राने आजवर आपली भूमिका विविध माध्यमातून मांडली आहे.अनेक प्रस्ताव आणि ठराव मांडून ते मंजूर केले आहेत. आजवर सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी अनेक लढे, आंदोलने उभारण्यात आली. मात्र महाराष्ट्राचे लक्ष वेधून सीमाप्रश्नाचा तिढा लवकरात लवकर सुटावा यासाठी मुंबईमध्ये आंदोलन छेडण्यात यावे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.
यानुसार कर्नाटकाला महाराष्ट्र सीमावासियांच्या पाठीशी आहे हे या आंदोलनातून दिसावे, आणि महाराष्ट्रात केवळ ठराव नको आता कृती झाली पाहिजे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. यावेळी दीपक दळवी, रमाकांत कोंडुसकर, सरस्वती पाटील, सरिता पाटील, शिवाजी सुंठकर आदींसह विविध समिती नेत्यांनी आणि मान्यवरांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.